शेतक-यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच
By admin | Published: June 4, 2017 09:48 AM2017-06-04T09:48:20+5:302017-06-04T10:34:42+5:30
संपकरी शेतकऱ्यांची समिती व मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णय मान्य न झाल्याचे सांगत रविवारी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4- संपकरी शेतकऱ्यांची समिती व मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णय मान्य न झाल्याचे सांगत रविवारी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले. एकीकडे संप मिटल्याची घोषणा आणि दुसरीकडे संप कायम ठेवण्याची भूमिका जाहीर झाल्याने संपात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवणार असल्याचं पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. पुणतांब्यात शनिवारी ग्रामसभा झाली, त्यात संपाचा निर्धार कायम ठेवण्यात आला. नाशिक जिल्ह्यातही आंदोलनाची धग कायम आहे. खान्देशातही संपाची धग कायम असली तरी बाजार समित्यांमध्ये अल्प प्रमाणात व्यवहार सुरू आहेत.
आज सकाळी अहमदनगरमध्ये नगर-कल्याण मार्गावर माळशेजजवळ शेतमाल घेऊन जाणारे वाहन पेटवण्यात आले आहे तर कालच्या विश्रांतीनंतर वर्ध्यात सालोड टी पॉइंटवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानंकडून पुन्हा सुरूवात करण्यात आली आहे, रस्त्यावर लाकडं जाळून भाजीपाला आणि दूध फेकून घोषणा देण्यात येत आहेत. सोलापूरमध्ये मोहोळ येथे आठवडा बाजार बंद करण्यात आला आहे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैय्या देशमुख यांनी येथील बाजार बंद केला आहे. नाशिकमध्ये शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर म्हसरुळ चौफुलीवर भोपळे फेकून शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. कर्जमाफी व हमीभाव मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात येत आहे. येवला तालुक्यातील पाटोदा येथेही शेतकरी संप चौथ्या दिवशीही सुरूच आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतत शासनाचा निषेध करीत आंदोलन तीव्र केले आहे .
शनिवारी राज्यातील पाच एकरपर्यंत शेतजमीन असलेले अल्पभूधारक आणि कर्ज थकीत असलेल्या २७ लाख शेतकऱ्यांचे ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची दिलासादायक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शेतकरी संप मागे घेतल्याची घोषणा आंदोलकांच्या कोअर कमिटीने केली होती. ही कर्जमाफी येत्या ३१ आॅक्टोबरपूर्वी अमलात येईल, हा माझा शेतकऱ्यांना शब्द आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ‘योग्य वेळी कर्जमाफी देऊ’ अशी भूमिका आपण आधीपासूनच घेतली होती. सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. मात्र, नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा देणारे काही निर्णय घेतले जातील, असे ते म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर एकीकडे संप मिटल्याची घोषणा आणि दुसरीकडे संप कायम ठेवण्याची भूमिका जाहीर झाल्याने संपात उभी फूट पडल्याचे चित्र आहे.
शेतकरी युद्धात जिंकला; तहात हरला - पवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना गंडवले, असा आरोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला आहे. शेतकरी संपामागे काँग्रेस व राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप करणे म्हणजे पोरकटपणा आहे. शेतकरी युद्धात जिंकला पण तहात हरला, असे पवार म्हणाले. कर्जमाफी केवळ अल्पभूधारकांनाच का? सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती, असे ते म्हणाले.