कृषिमंत्र्यांची उपोषणकर्ती बहीण विधानभवनात कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 02:45 AM2019-06-22T02:45:37+5:302019-06-22T06:36:34+5:30
रुग्णालयात दाखल; विधानसभेत तीव्र पडसाद
मुंबई : कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या शिक्षिका असलेल्या लहान भगिनी संगीता शिंदे या विधानसभवनात शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी आल्या खऱ्या पण पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण करीत असल्याने प्रकृती ढासळल्याने त्यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांना सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करावे लागले. तत्पूर्वी या उपोषणाचे आणि मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या उत्तराचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले.
संगीता शिंदे या शिक्षक संघर्ष संघटनेच्या नेत्या असून २००५ नंतर सेवेत लागलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी त्या चार दिवसांपासून ३८५ शिक्षकांसह बेमुदत उपोषण करत आहेत. शुक्रवारी विधानसभेत उपोषणाचे पडसाद उमटल्यानंतर शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी त्यांना चर्चेसाठी विधानभवनात बोलावून घेतले. शिंदे व इतर काही शिक्षक विधानभवन परिसरात आले पण शिंदे यांना भोवळ आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
तत्पूर्वी, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी विधानसभेत शून्य प्रहरात हा विषय उपस्थित केला. बेमुदत उपोषणावर बसलेल्या मंत्र्यांच्या बहिणीवरच असा प्रसंग गुदरला असेल तर सामान्यांचे काय असा हल्लाबोल विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत केला. शिवाय, बेमुदत उपोषणकर्त्यांना आझाद मैदानात सायंकाळनंतर पोलीस हुसकावून लावतात, ही मुस्कटदाबी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार आणि जगताप यांनी केला. पेन्शनची मागणी पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
त्यावर उत्तर देताना पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी, आधीच्या सरकारने केलेल्या चुका आम्ही एकेक करून निस्तारत आहोत, असे उत्तर दिल्याने विरोधक चांगलेच संतप्त झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य जागा सोडून समोर आले आणि जोरजोराने बोलू लागले. समोरून भाजप-शिवसेनेचे सदस्यही आल्याने काही क्षण तणावाचे वातावरण होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यातच काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी, उपोषणकर्त्यांना सायंकाळी हाकलून देणाºया पोलिसांची मनमानी खपवून का घेतली जात आहे, ही मस्ती कशासाठी असा संतप्त सवाल केला. रावल यांचे विधान कामकाजातून काढण्याची मागणी त्यांनी केली.
पर्यावरणमंत्र्यांनी टाकला वादावर पडदा
विरोधी पक्षांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी, आपण स्वत: उपोषणकर्त्यांची भेट घेऊ, सोबत शिक्षणमंत्र्यांनादेखील नेऊ, असे सांगत वादावर पडदा टाकला.