स्मार्ट सिटी योजनेसाठी कोरियन कंपनीशी करार
By admin | Published: April 7, 2017 03:30 AM2017-04-07T03:30:13+5:302017-04-07T03:30:13+5:30
कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेने कोरिया लॅण्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीशी गुरुवारी सामंजस्य करार केला
कल्याण : कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेने कोरिया लॅण्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीशी गुरुवारी सामंजस्य करार केला. ही कंपनी महापालिकेस स्मार्ट सिटी प्रकल्पाकरिता तांत्रिक व आर्थिक सहाय्य पुरवणार आहे. कोरिया सरकार चार हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देणार आहे. यामुळे प्रकल्प अधिक गतीमान होईल, असा दावा करण्यात आला.
यावेळी कंपनीचे पदाधिकारी कॅन कून फाँग, हु से चँग, पार्थ ज्यून सिमो, सॉन्ग जी सॉन्ग यांच्यासह महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, शिक्षण सभापती वैजयंती घोलप, सभागृह नेते राजेश मोरे, विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर, काँग्रेस गटनेते नंदू म्हात्रे, शिवसेना गटनेते रमेश जाधव, भाजप गटनेते वरुण पाटील यांच्यासह शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी व कोरियन कंपनीचे सल्लागार विवेक विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारने कोरियन कंपनीशी केलेल्या करारानुसार महाराष्ट्रातील पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली शहरांचा विकास ही कंपनी करणार आहे. या शहरांत विकासाला वाव असल्याने त्यांची निवड केल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
एरिया बेस व पॅन सिटी या दोन मार्गाने शहरांचा विकास केला जाणार आहे. एकूण २८ प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले जाणार आहेत. दरवर्षी २०० कोटी रुपये खर्चाची विकास कामे अपेक्षित असून त्यासाठी महापालिका दरवर्षी अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद करणार आहे.
कोरियन कंपनी प्रकल्पांचे मास्टर प्लॅन तयार करणार आहे. चार हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य कंपनी कमी व्याजदराने उपलब्ध करील व त्याची परतफेड कशी करायची याचे मार्गदर्शन सरकार करील, असे आयुक्त रवींद्रन यांनी स्पष्ट केले. महापौर देवळेकर म्हणाले की, या करारामुळे शहरे स्मार्ट करण्याच्या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ मिळणार आहे. येत्या पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने पडलेले हे पहिले पाऊल आहे.
कंपनीचे सल्लागार विवेक विचारे यांनी सांगितले की, करार करण्यात आलेली कंपनी ही सरकारी असून तिची स्थापना १९५२ मध्ये झाली. या कंपनीने कोरियातील ५० शहरे स्मार्ट केली आहेत. कंपनीकडे जवळपास ९ हजारांचे मनुष्यबळ आहे. (प्रतिनिधी)
>व्हिडीओ चित्रफितीत मांडला आराखडा
कंपनीने सादर केलेल्या व्हिडीओ चित्रफितीमध्ये स्मार्ट सिटीचा विकास कसा केला जाणार, याचा आराखडा दाखवण्यात आला. खाडी किनारा सुशोभिकरण, रेल्वे परिसर वाहतूककोंडी मुक्त करणे, वाहतुकीचे नियोजन, रस्ते विकास यावर भर देण्यात आला आहे. आयटी कंपन्या, ग्रीन लॅण्डचा विकास करुन त्याद्वारे शहरात नोकऱ्या उपलब्ध होतील. कल्याण-डोंबिवली शहरे २०१७ ते २०२३ या कालावधीत स्मार्ट करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी २ हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.