अपघाती मृत्यू रोखण्यासाठी करार
By admin | Published: February 24, 2016 01:44 AM2016-02-24T01:44:28+5:302016-02-24T01:44:28+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघाती मृत्यू रोखण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि सेव्ह लाइफ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेसोबत
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघाती मृत्यू रोखण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि सेव्ह लाइफ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेसोबत मंगळवारी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
केल्या. येत्या पाच वर्षांत महामार्गावरील अपघाती मृत्यूंची संख्या शून्यावर आणण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांचा समन्वय, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांची वाढणारी संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. दरडी
कोसळून अपघात होऊ नयेत,
यासाठी संरक्षक जाळी लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याचप्रमाणे, अपघातात वाहने उलटून प्राणहानी होऊ नये, यासाठी ब्रिफेन वायर रोप्स लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत.
महामार्गावरील अपघाती मृत्यू रोखण्यासाठी एमएसआरडीसी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि सेव्ह लाइफ फाउंडेशन संयुक्तपणे मोहीम राबविणार आहे. त्यासाठी संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना, अपघातग्रस्तांना तातडीची मदत, पोलिसांकडून प्रशिक्षण व नियमांची अंमलबजावणी या चार बाबींवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य महामार्ग पोलीस यंत्रणा, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर्स, डी.वाय. पाटील विद्यापीठ, ओगील्वी, जे.पी. रिसर्च आणि एक्स्प्रेस वेजवळील अनेक रुग्णालयांना मोहिमेशी जोडण्यात येणार आहे. दोन वर्षांपासून मोहिमेची तयारी सुरू असून, मुंबई-पुणे महामार्गाच्या प्रत्येक किलोमीटरचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. प्रत्येक टप्प्यावरील रस्त्याची स्थिती, वाहनचालकांना येणाऱ्या संभाव्य अडचणी, तांत्रिक चुकांचा अभ्यास करण्यात आल्याची माहिती राज्याचे माजी मुख्य सचिव आणि सेव्ह लाइफ फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक जयंत बांठिया यांनी सांगितले. तर देशातील रस्ते सुरक्षित बनविण्यावर महिंद्रा
अॅण्ड महिंद्राचा भर आहे. चांगली वाहने, तंत्रशुद्ध रस्ते, योग्य
वाहतूक नियमन, वाहनचालकांचे प्रशिक्षण, नियमांची प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय नाक्रा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
सेव्ह लाइफ फाउंडेशन आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यासह होत असलेल्या सामंजस्य करारामुळे, द्रुतगती महामार्गावरील अपघाती मृत्यू शून्यावर आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी सांगितले.