वस्त्रोद्योगातील गुंतवणुकीसाठी ३३ कंपन्यांशी करार; ५ हजार ५०० कोटींची गुंतवणूक होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 10:50 AM2023-11-02T10:50:39+5:302023-11-02T10:58:04+5:30
‘टेक्स फ्युचर २०२३’ या परिषदेतील यश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वस्त्रोद्योग विभाग आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांनी आयोजित केलेल्या ‘टेक्स फ्युचर २०२३’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत वस्त्रोद्योग घटकांतील ३३ कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यात ५ हजार ५०० कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहिती वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
वस्त्रोद्योग वाढीसाठी ‘फाइव्ह एफ व्हिजन’ची (म्हणजे फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन एक्स्पोर्ट) घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यामध्ये तांत्रिक वस्त्रोद्योगाला अधिक चालना देण्यात आली आहे, असे केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी सांगितले. या परिषदेला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्र शासनाच्या वस्त्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोहित कंसल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडिलकर, सीआयआयचे महाराष्ट्राचे अध्यक्ष के. नंदकुमार, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे (CII) प्रादेशिक संचालक डॉ. राजेश कपूर, रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया उपस्थित होते.