३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्यांनाही कृषी कर्जमाफी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 06:06 AM2019-09-04T06:06:37+5:302019-09-04T06:06:40+5:30
बैठकीत निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
मुंबई : कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील पूरग्रस्त भागात ३३ टक्के वा त्यापेक्षा अधिक शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचेही कृषी कर्ज माफ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांना ही कर्जमाफी देण्याचा निर्णय आधी घेण्यात आला होता. त्याऐवजी एनडीआरएफच्या नियमानुसार आता ३३ टक्के वा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्यांनाही ही माफी दिली जाईल. त्या बाबतचा आदेश लवकरच काढण्यात येईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली. पूरग्रस्तांना मदत आणि पुनर्वसन याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली असून तिची आज बैठक झाली. या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुभाष देसाई, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत उपस्थित होते. पाटण आणि जवळी येथील तात्पुरत्या निवाºयांसाठी आर्थिक तरतूद, मृत जनावरांपोटी मदत देण्यासाठी असलेल्या अटी आणखी शिथिल करणे इत्यादी निर्णय या बैठकीत घेण्यात आले. पुनर्वसनासाठी अतिरिक्त निधी मागण्यासाठी केंद्र सरकारकडे अतिरिक्त मागणीपत्र पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय चमूने नुकतीच पूरग्रस्त भागाला भेट दिली आणि त्यांनी काही सूचना केल्या आहेत, त्यावर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.