कृषिपंप वीज जोडणी : विदर्भातील कंत्राटदारांकडून निविदांकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 05:42 AM2018-07-11T05:42:24+5:302018-07-11T05:42:40+5:30
कृषीपंप वीज जोडणीच्या निविदांकडे विदर्भातील कंत्राटदारांनी पाठ फिरविली असून ते ‘लॉबी’ बनवून जास्त दर मागत असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.
नागपूर : कृषीपंप वीज जोडणीच्या निविदांकडे विदर्भातील कंत्राटदारांनी पाठ फिरविली असून ते ‘लॉबी’ बनवून जास्त दर मागत असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रकाश गजभिये यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पूर्व विदर्भातील कामांसाठी परिमंडळस्तरावर काढण्यात आलेल्या १४ निविदांपैकी १३ निविदांना व मंडळस्तरावर काढण्यात आलेल्या १६८ पैकी केवळ ८ निविदांना प्रतिसाद मिळाला. विदर्भातील कंत्राटदार ‘सीएसआर रेट’पेक्षा ३० टक्के अधिक दर मागत आहेत. यासंदर्भात चार वेळा बैठका झाल्या आहेत. राज्य शासनाने ८ टक्के अधिक दरावर काम देण्याची तयारी दाखविली आहे. मात्र तरीदेखील कंत्राटदार काम करायला तयार नाहीत. त्यांच्याशी चर्चा करुन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
राज्यातील इतर भागांमधील कंत्राटदार विभागाच्या दरानुसार काम करायला तयार आहेत. मात्र विदर्भातील कंत्राटदार ‘लॉबिंग’ करत आहेत. मात्र कुठल्याही स्थितीत निविदेचा दर ३० टक्क्यांहून वाढविण्यात येणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाने आतापर्यंत राज्यात ५ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज जोडणी दिली आहे. २ लाख ३५ हजार शेतकºयांच्या जोडण्या प्रलंबित आहेत. १५ आॅगस्टपासून जोडणीसाठी सुरुवात करण्यात येईल व डिसेंबर २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.