कैद्यांनी घेतले ३.६४ कोटींचे कृषी उत्पादन
By admin | Published: October 16, 2016 02:15 AM2016-10-16T02:15:48+5:302016-10-16T02:15:48+5:30
राज्यातील २९ कारागृहांमध्ये शेती उपयोगी क्षेत्र आहे. त्यामधील कैदी शेतीचे उत्पादन घेतात. २०१५-१६ या वर्षामध्ये कारागृहांतील कैद्यांनी ३.६४ कोटी रुपयांचे उत्पादन
- ब्रम्हानंद जाधव, बुलडाणा
राज्यातील २९ कारागृहांमध्ये शेती उपयोगी क्षेत्र आहे. त्यामधील कैदी शेतीचे उत्पादन घेतात. २०१५-१६ या वर्षामध्ये कारागृहांतील कैद्यांनी ३.६४ कोटी रुपयांचे उत्पादन घेतले असून, गेल्या सात वर्षांमध्ये कारागृहांतील शेतीच्या उत्पादनाचा आलेख चढाच असल्याचे दिसून येते.
राज्यातील २९ कारागृहांमध्ये एकूण ८१९.५८ हेक्टर जमीन आहे. त्यापैकी एकूण शेती उपयोगी क्षेत्र ३२७.२३ हेक्टर आहे. कैद्यांना दैनंदिन आहारासाठी लागणारा भाजीपाला व अन्नधान्य हे कारागृहाच्या शेतीक्षेत्रावर उत्पादित केले जाते, तसेच काही कारागृहांमध्ये दूध व मासे यांचे उत्पादन घेतले जाते. २०१५-१६ या वर्षामध्ये कारागृह शेतीवरती ८२९ पुरुष, तसेच ४० महिला कैद्यांना दररोज कारागृह शेतीमध्ये काम मिळालेले असून, शेतीमध्ये ३.६४ कोटी रुपयांचे उत्पादन मिळाले. त्यासाठी १.६० कोटी रुपये खर्च झाला असून, २.४ कोटी रुपये फायदा झाला आहे.
७ वर्षांत ८.७७ कोटी नफा
सन २००९-१० ते २०१५-१६ या सात वर्षांच्या कालावधीमध्ये कैद्यांनी सुमारे १६.९७ कोटी रुपयांचे कृषी उत्पादन घेतले आहे. त्यामध्ये ८.७७ कोटी रुपये नफा मिळाला आहे.
शेतीच्या उत्पादनाचा
आलेख वाढता
वर्ष उत्पन्न
२००९-१० १.७८ कोटी
२०१०-११ १.७२ कोटी
२०११-१२ १.७८ कोटी
२०१२-१३ २.१७ कोटी
२०१३-१४ २.५४ कोटी
२०१४-१५ ३.३४ कोटी
२०१५-१६ ३.६४ कोटी