शेती उत्पादनाला कर लागणार नाही
By admin | Published: November 14, 2016 05:22 AM2016-11-14T05:22:15+5:302016-11-14T05:22:15+5:30
काळ्या पैशाविरुद्धच्या कारवाईमुळे धास्तावलेले काहीजण शेती उत्पादनाला कर लागेल असा भ्रम पसरवित आहेत. मात्र असे काहीही होणार नाही
पुणे : काळ्या पैशाविरुद्धच्या कारवाईमुळे धास्तावलेले काहीजण शेती उत्पादनाला कर लागेल असा भ्रम पसरवित आहेत. मात्र असे काहीही होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठामपणे सांगितले. शुद्धीकरण आणि प्रामाणिकपर्वासाठी ३० डिसेंबरपर्यंत मला साथ द्या, असे भावनिक आवाहनहीमोदी यांनी केले़
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय ऊस परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन मोदी यांनी केले. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषीमंत्री तसेच ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष शिवाजीराव गिरीधर पाटील, महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
चलनबंदीच्या निर्णयावर बोलताना मोदी म्हणाले, तरुण पिढीच्या भवितव्यासाठी हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करणे आवश्यक होते. काहीजण म्हणताहेत आहेत की, नव्या नोटांची व्यवस्था यापूर्वी करता आली असती. मात्र, त्यामुळे ही बातमी फुटण्याचा धोका होता. बनावट नोटांचा खेळ परकीय देश खेळत होते, त्यांच्या देशासाठी छापल्या जाणाऱ्या चलनापेक्षा जास्त आपले चलन छापत होते़ नक्षलवादी, दहशतवादी त्याचा वापर करत होते, म्हणून या नोटा रद्दचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)