शेती उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठांनी संशोधनात्मक उपाययोजना कराव्यात- पांडुरंग फुंडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 10:59 PM2017-09-20T22:59:47+5:302017-09-20T23:00:24+5:30
राज्याच्या चार कृषी विद्यापीठांमार्फत पीक खर्चाच्या आधारावरून कृषी मालाला हमी भावाची शिफारस केंद्र शासनाला केली जाते. सातत्याने कृषी खर्च वाढून उत्पादकता वाढत नाही. ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिले.
मुंबई, दि.२०: राज्याच्या चार कृषी विद्यापीठांमार्फत पीक खर्चाच्या आधारावरून कृषी मालाला हमी भावाची शिफारस केंद्र शासनाला केली जाते. सातत्याने कृषी खर्च वाढून उत्पादकता वाढत नाही. ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिले.
राज्य कृषिमूल्य आयोगाची पहिली बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यावेळी उपस्थित होते.
कृषिमंत्री यावेळी म्हणाले की रब्बी हंगामाच्या सन 2018 19 वर्षाचे नियोजन देखील या दृष्टीने झाले पाहिजे. कृषी खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी स्थिती असेल तर उत्पादन जास्त येण्यासाठी शेतकऱ्यांना उपयोजना सांगणं आवश्यक आहे त्यासाठी सुरू करण्यात आलेले उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभिनयान उपयुक्त ठरत आहे. मात्र राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना कृषी उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने संशोधन करावे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी उपसमितीने हमीभावबाबत दिलेल्या शिफारशी स्वीकारण्यात आल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले. बैठकीस कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.