खेड्यातच कृषी उद्योजक तयार व्हावेत- कुलगुरू
By admin | Published: February 25, 2017 02:21 AM2017-02-25T02:21:21+5:302017-02-25T02:21:21+5:30
राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप; देशातील २५0 शास्त्रज्ञांची उपस्थिती
अकोला, दि. २४- ग्रामीण भागातील शेतकरी, जनतेच्या सामाजिक, आर्थिक स्थितीत बदल घडवून आणायचे असतील, तर खेड्यातच उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. याकरिता कृषी प्रक्रियेवर आधारित 'उद्योजकता विकास' या विषयावर परिसंवाद घेणेदेखील काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्यावतीने २२ व २३ फेब्रुवारी असे दोन दिवसीय ह्यशाश्वत जीवन शैलीह्ण कृषी प्रक्रियेवर आधारित ह्यउद्योजकता विकासह्ण या विषयावर कृषी विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी डॉ. दाणी बोलत होते. व्यासपीठावर माजी कुलगुरू डॉ. बी.जी. बथकल, कृषी विभागाचे सहसचालक डॉ.एस.आर. सरदार, संशोधन संचालक डॉ.डी.एम. मानकर, विस्तार संचालक डॉ.पी.जी. इंगोले, अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एम.बी. नागदेवे, कापणीपश्चात संशोधन तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर यांची उपस्थिती होती.
डॉ. दाणी पुढे बोलताना म्हणाले, कृषी शेतमाल प्रक्रियेवर आधारित उद्योग निर्माण करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने गावागावांत उद्योजक निर्माण केले आहेत. या उद्योजक शेतकर्यांचा येथे सन्मान होणे हेच देशातील शेतकर्यांसमोर प्रेरणादायी ठरणारे आहे. हे शेतकरी खरे रोल मॉडेल ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. बथकल यांनी कृषी प्रक्रिया उद्योगात भारत खूप पिछाडीवर असल्याचे सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ करायची असेल, तर ग्रामीण भागातच प्रक्रिया उद्योग व उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. जागतिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी आता हे अपरिहार्य असल्याचे ते म्हणाले. डॉ. इंगोले, डॉ. मानकर, डॉ. नागदेवे यांनी या संदर्भात विचार मांडले.
परिसंवादाला देशातील या विषयातील २५0 पेक्षा अधिक तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योजक, शेतकर्यांची उपस्थिती होती. या परिसंवादात ४३५ संशोधन पेपर्सचे वाचन करण्यात आले. येथे पोस्टर्स प्रदर्शन लावण्यात आले होते. २४ जणांनी यामध्ये सहभाग घेतला. त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनिल कांबळे यांनी, तर आभार डॉ. प्रदीप बोरकर यांनी मानले.
कृषी विद्यापीठाने केले उद्योजक तयार
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रक्रिया यंत्र तयार केले असून, हे यंत्र शेतकरी व महिला बचत गटांना गावागावांत देण्यात आले आहेत. यासाठीचे तंत्रज्ञान त्यांना कृषी विद्यापीठाने पुरविले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुढाकाराने परिसंवाद व प्रक्रिया उद्योगाचे जाळे विदर्भात विणले जात आहे.