राज्याचा कृषी विकास दर १२ टक्के!
By admin | Published: April 3, 2017 02:22 AM2017-04-03T02:22:40+5:302017-04-03T02:22:40+5:30
मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन; पोहरादेवी येथील लक्षचंडी महायज्ञाला उपस्थिती.
वाशिम, दि. २- शासनाने गेल्या दोन वर्षात राबविलेले जलयुक्त शिवार अभियान व सिंचन विहिरीसारख्या उपाययोजनांमुळे शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांंंंपासून उणे असलेला राज्याचा कृषी विकास दर यंदा १२ टक्के झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असणार्या पोहरादेवी येथे आयोजित विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री रविवारी पोहरादेवी येथे आले असता जाहीर कार्यक्रमात त्यांनी राज्यातील कृषी विकासाची प्रगती अधोरेखित केली. मुख्यमंत्री म्हणाले की, कृषी पंपांच्या प्रलंबित वीज जोडण्या तातडीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आगामी काळात कृषी पंपासाठी मागेल त्याला तातडीने वीज उपलब्ध करून देण्यात येईल. वाशिम जिल्ह्यातही जलयुक्त शिवार अभियान व सिंचन विहिरींचे काम सुरू असून, कारंजा, मानोरा तालुक्यासाठी येत्या काळात ३ हजार सिंचन विहिरी देण्यात येतील, त्याकरिता जिल्हाधिकार्यांमार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवीचा विकास करण्यासाठी ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. विकास आराखड्याची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यात येतील. या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बंजारा समाजाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी ना. पंकजा मुंडे, पालकमंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले.
याप्रसंगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार मनोहर नाईक, आमदार हरिभाऊ राठोड, पोहरादेवी संस्थानचे प्रमुख रामराव महाराज, माजी आमदार अनंतराव पाटील, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस विशेष महानिरीक्षक विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराव महाराज यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाला भेट
विश्वशांतीसाठी अखिल भारतीय बंजारा शक्तिपीठाच्या वतीने २४ मार्चपासून लक्षचंडी महायज्ञ सुरू करण्यात आला आहे. या महायज्ञाची सांगता ३ एप्रिल रोजी होणार आहे. या यज्ञास रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी येथील जगदंबा माता व संत सेवालाल महाराज समाधीचे दर्शन घेतले. जगदंबा माता मंदिर येथे कबीरदास महाराज यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.