नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यास कटिबद्ध- कृषिमंत्री अब्दुल सत्तार
By सुनील काकडे | Published: September 23, 2022 06:33 PM2022-09-23T18:33:31+5:302022-09-23T18:34:43+5:30
मंगरूळपिरात झाला हिंदू गर्व गर्जना मेळावा
वाशिम: संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला यापूर्वीच देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही; तर भरीव आर्थिक मदत देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
आज, २३ सप्टेंबर रोजी मंगरुळपीर येथील जुन्या पंचायत समिती सभागृहात हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क अभियानांतर्गत पार पडलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या. शिंदे गट जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे, नवी मुंबईचे माजी नगरसेवक संजू आधारवाडे, तालुका प्रमुख मनिष गहुले, अनिल गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खासदार गवळी यांनीही शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विद्यमान राज्य सरकारचे सर्वंकष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पीक विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा; अन्यथास विमा कंपनीच्या प्रतिनिधींना रस्त्यावरही फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हाप्रमुख ठाकरे, संजय वाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शेतबांधावरील प्रयोगशाळेला सत्तार यांनी दिली भेट
अब्दुल सत्तार यांनी दाैऱ्यात मालेगांव येथील मालेगाव तालुका शेतकरी उत्पादक कंपनीने सुरु केलेल्या शेतबांधावरील प्रयोगशाळेलाही भेट दिली. मानव विकास मिशन व कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात १३ ठिकाणी शेतबांधावर प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या निविष्ठांवरील खर्चात मोठी बचत झाली आहे. प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा, वेस्ट डिकम्पोझर, सी विड व पोटॅशीयम हुमेट बेस निविष्ठा, निम व करंज बेस निविष्ठा आणि सिलीकॉन बेस निविष्ठांची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती डॉ. माने यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिली.