Abdul Sattar : "दुश्मन को भी जिंदा रखने की दुवा करनेवाला मुख्यमंत्री"; अब्दुल सत्तारांनी केलं भरभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 10:35 AM2022-09-01T10:35:42+5:302022-09-01T10:43:48+5:30
Abdul Sattar : शेतकरी समस्यांच्या मुळापर्यंत जाणेसाठी राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" हा उपक्रम राज्यभर राबविण्याची संकल्पना मांडलेली आहे.
सुलभ आणि प्रभावी कृषि विषयक धोरण तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न प्रशासनाने समजून घेणे, त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करून शेतकरी समस्यांच्या मुळापर्यंत जाणेसाठी राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" हा उपक्रम राज्यभर राबविण्याची संकल्पना मांडलेली आहे. याच दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक केलं आहे.
"दुश्मन को भी जिंदा रखने की दुवा करनेवाला मुख्यमंत्री" असं म्हटलं आहे. तसेच भविष्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही यावर उपाययोजना निश्चित केल्या जातील असंही सांगितलं. "ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्यापैकी एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही. तंतोतंत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 90 टक्के भागाचे पंचनामे झाले असून 10 टक्के भागात पाणी साचलं असल्याने ते राहिलं आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी डबल नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला घेतला."
"एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही"
"सरकारकडून सर्वांना मदत मिळेल. पहिलांदा गतिमान सरकार आलं आहे. विरोधकांचं काम विरोध करणं हेच आहे. पण आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे "दुश्मन को भी जिंदा रखने की दुवा करनेवाला मुख्यमंत्री" आहेत. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेणार, निराश झालेल्या शेतकऱ्यांना परत उभं करण्यासाठी त्याला सक्षम करण्यासाठी काम करणार. भविष्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही यावर उपाययोजना निश्चित केल्या जातील" असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"भविष्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही"
या उपक्रमाची राज्यस्तरीय सुरुवात 1 सप्टेंबर, 2022 रोजी स्वत: कृषि मंत्री महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम अशा मेळघाटातून करणार आहेत. धारणी चिखलदरा या अत्यंत दुर्गम ,डोंगराळ, कोरडवाहू व आदिवासी बहुल तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत ते संपूर्ण दिवसभर असणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी,समस्या, त्यातून निर्माण होणारे नैराश्य व त्यातून उद्भवणाऱ्या शेतकरी आत्महत्या यासंदर्भात योजना तयार करणारे व ती राबविणारे शासनाचे वेगवेगळे विभाग यांना याबाबतची कारणमीमांसा करून आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे या अनुषगाने हा उपक्रम सुरू केलेला आहे.