राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन, भाजपाचा निष्ठावान शिलेदार हरपला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 07:58 AM2018-05-31T07:58:50+5:302018-05-31T10:12:23+5:30

 कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं के. जे. सोमय्या रुग्णालयात निधन झालं.  रात्री एकच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Agriculture Minister pandurang fundkar passed away | राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन, भाजपाचा निष्ठावान शिलेदार हरपला

राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन, भाजपाचा निष्ठावान शिलेदार हरपला

Next

मुंबई: कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं के. जे. सोमय्या रुग्णालयात निधन झालं. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमय्या यांना कालच सोमय्या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं. रात्री त्यांची प्रकृती ठिक होती. पण रात्री साडे बारा ते एकच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यावेळी डॉक्टरही सोबत होते. पण हृदयविकाराचा झटका तीव्र असल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव खामगाव येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे. नऊ वाजता मुख्यमंत्री सोमय्या रुग्णालयात फुंडकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतील.

साधारणपणे वीस दिवस आधी भाऊसाहेब फुंडकर यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. त्यावेळी प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. म्हणून सकाळी दहा वाजता त्यांना के जे सोमय्या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.  पण रात्री आठ वाजता पुन्हा श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला आणि रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ सुनीता फुंडकर, मुलगा सागर  फुंडकर त्यांचे नजिकचे स्नेही अनिलभाई राजभोर तसेच अन्य नातेवाईकही हजर होते. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पण अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ही बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली. मुख्यमंत्री सकाळी नऊ वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये येण्याची शक्यता आहे. तसेच चंद्रकांत पाटील आणि महादेव जानकर हे देखील रुग्णालयात पोहोचत आहेत. त्यांचा मुलगा आमदार आकाश फुंडकर हे काल खामगाव येथे होते.  त्यांना हे वृत्त कळताच ते सकाळी साडेसातच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये पोहोचले.  फुंडकर यांचे पार्थिव साधारणपणे दहा ते अकराच्या दरम्यान खामगावकडे नेण्यात येईल. मात्र त्यांच्यावर कधी अंत्यसंस्कार होतील, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. 

राज्यात काँग्रेसचं वर्चस्व असताना भाजपा वाढवण्याचं काम फुंडकर यांनी केलं. फुंडकर यांच्या निधनानं राज्यात भाजपा रुजवणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होतेय. कृषीमंत्री म्हणून फुंडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. प्रसारमाध्यमांपासून दूर राहून काम  करणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाला ग्रामीण भागापर्यंत नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कार्यकर्त्यांमध्ये भाऊसाहेब नावानं ओळखले जाणाऱ्या फुंडकर यांनी विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये काम केलंय. याशिवाय ते भाजपाचे प्रदेशाध्यक्षदेखील राहिले आहेत. 

पांडुरंग फुंडकर यांच्या अकाली निधनानं भाजपासह सर्वांनाच धक्का बसला आहे. फुंडकर आजारी नव्हते. मात्र अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. राज्यात भाजपा वाढवण्यासाठी फुंडकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासह मोठे प्रयत्न केले. ग्रामीण आणि शेती प्रश्नाची जाण असणारा नेता, अशी फुंडकर यांची ओळख होती. फुंडकर बुलडाण्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. 

 

फुंडकर हे लोकनेते आणि समर्पित लोकप्रतिनिधी होते. कृषिमंत्री असताना ते मला नियमितपणे भेटत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती व त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिक इच्छा होती. फुंडकर यांचे संघटन कौशल्य सर्वज्ञात होते. त्यांनी जनतेशी असलेली आपली नाळ आयुष्यभर जपली. महाराष्ट्राने एक उत्तम संसदपटू गमावला आहे.
-सी.विद्यासागर राव,
राज्यपाल
भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने कृषी, सहकार आणि संबंधित विषयांची सखोल जाण असणारा आणि या क्षेत्रात सकारात्मक परिवर्तनासाठी प्रयत्नशील असणारा नेता राज्याने गमावला आहे. मी ज्येष्ठ सहकारी व मार्गदर्शकास मुकलो. आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अशा जबाबदाºया सांभाळताना त्यांनी भाजपाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
विदर्भातील एका ज्येष्ठ सहृदयी, मातीशी घट्ट नाळ असलेल्या नेत्याच्या जाण्याचे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अतिशय मनमिळावू, मृदू स्वभावाचे फुंडकर यांनी विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नी कणखर भूमिका घेतली. कृषी मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द वाखाणण्यासारखी होती.
- शरद पवार, अध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस
फुंडकर यांच्या निधनामुळे एक संयमी, संवेदनशील व अनुभवी लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वत:ची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून समोर येत त्यांनी राजकारणात मोठे काम केले. सर्व पक्षांच्या नेत्यांशी त्यांनी मैत्र जपले.
-राधाकृष्ण विखे पाटील,
विरोधी पक्षनेते विधानसभा
फुंडकर यांच्या निधनाने जनसंघ व भाजपाचा समर्पित निष्ठावान नेता आम्ही गमावला. नव्या-जुन्या पिढ्यांना जोडणारा पक्षातील महत्त्वाचा दुवा निखळला आहे. भाजपावर त्यांची अढळ निष्ठा होती. ग्रामीण भागात व शेतकºयांमध्ये भाजपा लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
- खा.रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा
भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने एक सच्चा भूमीपुत्र हरपला आहे. कृषी व सहकार क्षेत्राचा दांडगा अभ्यास असलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचे स्थान वरचे होते. लोकमत परिवाराशी त्यांचे अत्यंत निकटचे संबंध होते. वैयक्तिक पातळीवरही माझे त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची भेट झाली होती. त्यावेळीही भाऊसाहेब नेहमीप्रमाणेच दिलखुलास होते. त्यांच्या संदर्भात अशी दु:खद वार्ता ऐकावयास मिळेल, असे अजिबात वाटले नव्हते.
- विजय दर्डा, चेअरमन,
लोकमत एडिटोरियल बोर्ड

Web Title: Agriculture Minister pandurang fundkar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.