कीटकनाशकांच्या किमतीवर नियंत्रण आणणार: कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:20 AM2017-10-11T04:20:45+5:302017-10-11T04:21:10+5:30
कीटकनाशकांचे उत्पादक मनमानी किमतीने त्यांची विक्री करतात. डीलरच्या माध्यमातून शेतकºयांच्या गळी अप्रमाणित कीटकनाशके उतरवतात.
विशेष प्रतिनिधी ।
मुंबई : कीटकनाशकांचे उत्पादक मनमानी किमतीने त्यांची विक्री करतात. डीलरच्या माध्यमातून शेतकºयांच्या गळी अप्रमाणित कीटकनाशके उतरवतात. यापुढे प्रमाणित कीटकनाशकांचीच विक्री केली जाईल. तसेच, त्यांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा उभारली जाणार असल्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत यवतमाळसह विदर्भातील शेतकºयांचे किटकनाशकांच्या फवारणीमुळे मृत्यू झाल्याचे तीव्र पडसाद उमटले. भाजपा-शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बाबत विचारणा केली. त्यावेळी फुंडकर यांनी नेमके काय घडले याची माहिती दिली.
ऊसासाठी वापरण्यात येणारे किटकनाशक हे कापसावरील फवारणीसाठी अनेक ठिकाणी वापरण्यात आले. उत्पादक, डिलरांच्या संगनमतातून असे प्रकार घडले. कीटकनाशकांपैकी घरडा केमिकल्सच्या ‘पोलीस’ या अप्रमाणित कीटकनाशकाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, सिंजंटा कंपनीचे पोलो हे किटकनाशक चुकीच्या पद्धतीने वापरले. त्यामुळे त्याच्या वापरावरही बंदी घातल्याची माहिती फुंडकर यांनी दिली. शिवाय, चिनी फवारणी यंत्र वापरावर बंदी घातली जाईल. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे एखाद्या शेतकºयाची प्रकृती बिघडली असेल तर पोलीस पाटलांपासून शासकीय दवाखाना, स्थानिक प्रशासन यांना तत्काळ माहिती देण्याची पद्धतही ठरविली जाणार आहे, असे फुंडकर यांनी सांगितले.