कृषी समृद्धी ८५ गावांत
By admin | Published: June 7, 2017 03:57 AM2017-06-07T03:57:44+5:302017-06-07T03:57:44+5:30
शेतीची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान शासनाने हाती घेतले
अनिरुद्ध पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : शेतीची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान शासनाने हाती घेतले असून ते तालुका कृषी विभागातर्फे १ मे ते १५ मे आणि २४ मे ते ८ जून अशा दोन टप्यात राबविले जाणार आहे.
डहाणू तालुक्यातील खरीप हंगामाचे भात क्षेत्र १५ हजार हेक्टर असून हळवे २५४५ हे., निमगरवे ९९०६ हे. आणि गरवे २५४० हे. इतके आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १९१० मिमी असून डोंगरी आणि सागरी भागात भाताचे उत्पादन घेतले जाते. डहाणू पंचायत समिती कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर कर्जत ३ या हळव्या भाताच्या बियाणाचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती कृषी अधिकारी ए. बी. जैन यांनी दिली.
या योजनेचा फायदा ८५ ग्रामपंचायतीतील १७४ गावांमधील प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याचे उद्दीष्ट आहे. डहाणू, कासा आणि वाणगाव या तीन मंडळाचे अधिकारी, ६ सुपरवायझर व २८ कृषी सहाय्यकांच्या मदतीने प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केल्याची माहिती कृषी अधिकारी आर. यू. ईभाड यांनी दिली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून भाताची अनुवांशिक उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन वाढविणे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा समावेश करणे आणि शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन यंत्राचा जास्तीत-जास्त अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे या स्वरूपात ही योजना राबविली जाईल. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, या करिता विशेष मोहीम राबवली जाणे आवश्यक असून बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागामार्फत तालुक्यात भरारी पथकाची नियुक्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
>भाताच्या गुजरात वाणाला महाराष्ट्रात बंदी का ?
शासनाच्या कृषी विभागामार्फत केवळ एकाच जातीचे भात बियाणे पुरविले जात आहे. येथील जमितीन गुजरात या भात वाणापासून दर्जेदार पीक मिळत असून सरासरी उत्पादन चांगले येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
गुजरात ४ (हळवे) आणि ११ (गरवे) दोन प्रकारात ते उपलब्ध असून कोलम या भाताशी साम्य आहे. त्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या वाणाला महाराष्ट्रात विक्रीकरिता बंदी आहे.
त्यामुळे त्याच्या खरेदीसाठी गुजरातमध्ये जावे लागत आहे. शासनाकडून लादलेल्या बंदीचे कारण अद्याप समजलेले नाही तथापि शेतकऱ्यांच्या हिताकरिता ही बंदी तत्काळ हटविण्याची मागणी करण्यात येत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून जनजागृती करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कृषी उत्पादन वाढविणे हा त्या मागचा उद्देश आहे.
- आर. यू. इभाड, तालुका कृषी अधिकारी, डहाणू
या विभागात भाताच्या खरीप हंगामासाठी १५० क्विंटल भात वाणांचा पुरवठा झाला आहे. ७/१२ च्या उताऱ्याची प्रत जमा करून १० किलोसाठी १७० रु पये आकारणी केली जाते. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
- ए. बी. जैन, कृषी अधिकारी, डहाणू पंचायत समिती