कृषी पंपांना मिळणार आता अखंड वीज
By admin | Published: September 7, 2016 05:23 AM2016-09-07T05:23:02+5:302016-09-07T05:23:02+5:30
पुढील सलग तीन महिने राज्यातील ३८ लाख कृषी पंपांना पहाटे ५.३० ते सायंकाळी असा १२ तास अखंड वीजपुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : पुढील सलग तीन महिने राज्यातील ३८ लाख कृषी पंपांना पहाटे ५.३० ते सायंकाळी असा १२ तास अखंड वीजपुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत आठच तास वीजपुरवठा करण्यात येत होता आणि तोदेखील बहुतांश ठिकाणी रात्रीच्या वेळी. या निर्णयाने शेतकऱ्यांना जादा काळ आणि तेही दिवसा वीज मिळणार आहे.
मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने येथील पिकांना पाण्याची गरज आहे. पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी वीजपुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महावितरणला दिले. काही ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेत पाणी असूनही वीजेअभावी ते शेतीला देता येत नाही. त्यामुळे दिवसाच्या वेळी वीज उपलब्ध करुन दिल्यास, पिकांना फायदा होईल. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत कृषीपंपांसाठी आठऐवजी १२ तास वीजपुरवठा तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, वीजपंपांना १२ तास वीज दिल्याने सबसिडीचा सुमारे ५०० कोटींचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
वीजचोरीबाबत सध्या राज्यात सहा सर्कलमधील पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवून घेतली जाते. यामुळे वीजचोरीच्या प्रकरणात कारवाई करताना वेळेचा अपव्यव होतो. ते रोखण्यासाठी आणि वीज चोरीला प्रतिबंध घातला यावा यासाठी आता सर्वच जिल्ह्यांमध्ये दोन किंवा तीन पोलीस ठाणे प्राधिकृत करु न तेथे वीजचोरीची तक्र ार नोंदवून घेतली जाईल. वीजचोरी रोखण्यासाठी वीज महामंडळामार्फत भरारी पथकांच्या सहाय्याने प्रयत्न करावेत. सुरक्षा मंडळ अधिक सक्षम करु न वीजचोरी रोखावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. याशिवाय, एका अधीक्षक अभियंत्यांच्या नेतृत्वात पथकही स्थापन करण्यात येईल.
सौर ऊर्जेसाठी फिडर
सौर ऊर्जापुरवठ्यासाठी आता स्वतंत्र फिडर उभारण्यात येणार आहे. संगमनेर तालुक्यात प्रायोगिक तत्वावर त्याची सुरुवात लवकरच करण्यात येईल. या तालुक्यातील कर्जुले पठार व निमोण उपकेंद्र येथे प्रायोगिक तत्त्वावर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुढील काळात सौर ऊर्जेच्या अधिक वापरावर भर दिला जाईल.