महाराष्ट्रात साडेतीन हजार वर्षांपूर्वी केली जात होती शेती, मिळाले पुरावे; कोल्हापूरच्या संशोधकांचे संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 06:53 PM2022-10-19T18:53:12+5:302022-10-19T18:54:12+5:30
उत्खननात आढळली शेती अवजारे
संदीप आडनाईक
कोल्हापूर : गोंदिया जिल्ह्यात लोहयुगकालीन कृषी अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा प्रबंध ऑक्टोबर महिन्याच्या करंट सायन्स या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यामुळे सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वीही महाराष्ट्रात शेती होत असल्याच्या पुराव्याला भक्कम आधार मिळाला आहे. मूळचे कोल्हापूरचे, पण सध्या डेक्कन कॉलेजमध्ये प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र विभागात पुरावनस्पती शास्त्राचे संशोधक असलेल्या डॉ. सतीश नाईक यांनी नागपूरच्या पुरातत्त्व विभागाचे डॉ. विराग सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केले आहे.
गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील मल्ली येथील पुरातत्त्वीय स्थळाचे उत्खनन २०१०-११ आणि २०१२-१३ मध्ये केले होते. हे स्थळ नागपूरपासून १३५ किलोमीटर पूर्वेस चोरखंबारा या वैनगंगेच्या उपनदीच्या डाव्या तीरावर आहे. यात आद्य लोहयुगकालीन संस्कृतीचे अवशेष आढळले. याची पुष्टी वैज्ञानिक रेडिओ कार्बन डेटिंग पद्धतीने केली आहे. डॉ. नाईक यांनी मल्लीच्या उत्खननात ७९ मातीचे नमुने घेऊन जळालेल्या धान्याचे तरंगतंत्रज्ञानाद्वारे, प्रयोगशाळेत विलगीकरण करून संशोधन केले. यातून ४१७४ वनस्पतींचे अवशेष मिळाले.
यात तांदूळ, वेगवेगळ्या तृणधान्य, कडधान्य, जंगली फळेवर्गीय वनस्पतींचे अवशेष आणि भात शेतीमधील तणांचे अवशेष आढळले. यात तांदळाचे प्रमाण ४८ टक्के होते. तृणधान्यांत कोडोमिलेट, सावा मिलेट, ब्राऊनटॉप मिलेट, फॉक्सटेल मिलेटस्चा समावेश होता. कडधान्यांत उडीद, मूग, कुळीथ, पावटा, लाख इत्यादी द्विदल वनस्पतींचे बी व तेलबियांत मोहरी आढळली. भात पिकाच्या तणांपैकी लव्हाळेवर्गीय वनस्पती, रिंकल ग्रास सापडले. जंगली फळांच्या बियांपैकी बोरं, वांगी मिळाली आहे. काळी मुसळी, डेफ्लावर, निळी या औषधी वनस्पतींचे अवशेषही आढळले.
उत्खननात आढळली शेती अवजारे
या प्राचीन स्थळाचा कालावधी ३४०० वर्षांपूर्वीचा असल्याचे स्पष्ट होते. येथे आद्य लोहयुगकालीन संस्कृतीची वसाहत आणि ४०० मेगालिथस कालावधीतील मानवी दफनभूमीचे अवशेष आहेत. यात मृदभांडी, शेतीची अवजारे, विळा, कुऱ्हाडी, सुरी, अशा लोखंडाच्या वस्तूही आढळल्या आहेत.
आद्य लोहयुगापासून औषधी वनस्पतींचा वापर भारत करीत आला आहे. निळीचा उपयोग मृद भांड्यावर रंगकाम, नक्षीकामासाठी केला असावा. आयुर्वेदात आजारावरही नीळ वापरल्याचे संदर्भ आहेत. विदर्भात तांदूळ हा ताम्रपाषाण काळापासून पिकवला जातो. मल्ली हे ठिकाण अतिपावसाच्या प्रदेशात असल्यामुळे येथे तांदूळ पिकवण्यासाठी अनुकूल, पोषक हवामान मिळाले. -डॉ. सतीश नाईक, पुरावनस्पती शास्त्रज्ञ, डेक्कन कॉलेज, पुणे