अहमद जावेद यांची नियुक्ती बेकायदेशीर?
By admin | Published: September 9, 2015 01:32 AM2015-09-09T01:32:13+5:302015-09-09T01:32:13+5:30
राज्य गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची महासंचालकपदी पदोन्नतीवर नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या जागी राज्य शासनाने अहमद जावेद यांची नियुक्ती केली आहे.
- जितेंद्र कालेकर, ठाणे
राज्य गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची महासंचालकपदी पदोन्नतीवर नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या जागी राज्य शासनाने अहमद जावेद यांची नियुक्ती केली आहे. मात्र, जावेद यांच्याविरुद्ध पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे दाखल करून चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यावर त्यांनी स्थगिती मिळविली असून, त्याबाबतची पुढील सुनावणी येत्या १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. असे असताना त्यांना मुंबई पोलीस प्रमुखपदावर नियुक्त करणे हे नियमबाह्य असल्याचा आरोप अॅड. आशिष मेहता यांनी केला आहे.
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त एम.एन. सिंग आणि उपायुक्त एस.पी. गुप्ता यांनी सुमारे एक हजार पोलिसांच्या बदल्यांमध्ये केलेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी निवृत्त सहायक फौजदार बबन जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच तक्रारीमुळे त्यांना खात्यातून बडतर्फ केले होते. त्यात ते निर्दोष ठरल्यामुळे त्यांना सन्मानाने पुन्हा सेवेत घेण्याचे आदेशही बजावले होते. सेवेत आल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेऊन मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस.व्ही. रणपिसे यांनी पोलीस आयुक्त एम.एन. सिंग (आता निवृत्त), अहमद जावेद, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस.पी. गुप्ता, उपायुक्त विश्वास साळवे (निवृत्त), सहायक पोलीस आयुक्त विलास शिंदे आणि गृह विभागाचे कक्ष अधिकारी पी.एम. वानखेडे या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध १५६ (३)नुसार गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश डिसेंबर २०१४मध्ये दिले होते. त्यानंतर अहमद यांनी गुन्हा दाखल न करण्याबाबत न्यायालयातून ५ डिसेंबर रोजी स्थगिती मिळविली होती.