अहमदनगर दारूबळीची सीआयडी चौकशी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2017 02:38 AM2017-03-23T02:38:50+5:302017-03-23T02:38:50+5:30
१५ जणांचा बळी घेणाऱ्या पांगरमल जि.अहमदनगर येथील दुर्घटनेची आयडी मार्फत चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल
मुंबई : १५ जणांचा बळी घेणाऱ्या पांगरमल जि.अहमदनगर येथील दुर्घटनेची आयडी मार्फत चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
भाजपाचे शिवाजीराव कर्डिले, किसन कथोरे आदी आमदारांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमांतून हा विषय उपस्थित केला होता.
कर्डिले म्हणाले की, दुर्घटनेच्या एवढ्या दिवसांनंतरही पोलिसांना तीन आरोपी सापडू शकलेले नाहीत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील पार्टीमध्ये दारू पाजण्यात आली होती आणि त्यात हे बळी गेले.
एवढ्या लोकांचा बळी घेणाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. २००४ मध्ये याच भागात बनावट दारुचा कारखाना पकडण्यात आला होता. त्यावेळी कारखाना मालकाऐवजी कामगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्या कारखान्याचे धागेदोरे परवाच्या घटनेपर्यंत आहेत. तेव्हाच पालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असते तर अलिकडची दुर्घटना टळली असती. बावनकुळे यांनी सांगितले की, बनावट दारु प्रकरणी मुख्य आरोपी दादा वाणी याला अटक करण्यात आली. एकूण १९ आरोपींपैकी १६ आरोपिंना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागातील सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यात एक उपअधिक्षक, दोन दुय्यम निरीक्षक आणि तीन जवानांचा समावेश आहे.
या बनावट दारु प्रकरणात जे मृत्यृमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रु पये शासनातर्फे देण्यात आले आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयातील उपहारगृहांची तपासणी करण्यात येणार असून नियमबाहय बाबी आढळल्या तर कारवाईची शिफारस करण्यात येणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दादा वाणी याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे ही उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)