Ahmednagar Hospital Fire : रुग्णालयातील आग प्रकरणी ४ जणांचं निलंबन, २ जणांची सेवा समाप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 09:57 PM2021-11-08T21:57:25+5:302021-11-08T21:57:51+5:30
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती. रुग्णालयात लागलेल्या आगीत ११ जणांचा झाला होता मृत्यू.
अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले होते. या प्रकरणी आता सहा जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसंच वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे यांचंदेखील निलंबन करण्यात आलं आहे. तर परिचारिका सपना पाठारे यांचं निलंबन करण्यात आलं असून परिचारिका आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा - निलंबित
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 8, 2021
2. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित
3. डॉ. विशाखा शिंदे - वैद्यकीय अधिकारी- निलंबित
4. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित
5. आस्मा शेख -स्टाफ नर्स - सेवा समाप्त
6. चन्ना आनंत - स्टाफ नर्स- सेवा समाप्त
2/2
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. तर दुसरीकडे या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.