अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील घटनेची सखोल चौकशी होईल; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 08:31 PM2021-11-06T20:31:15+5:302021-11-06T20:31:54+5:30
दुर्घटनेवेळी आम्ही राजकारण करत नाही. जे राजकारण करत असतील ते दुर्दैवी आहेत, भारती पवार यांचं वक्तव्य.
अहमदनगर: "जिल्हा रुग्णालयातील घडलेली घटना दुर्दैवी आहे. झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होईल," असे आश्वासन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिले. या घटनेचे येथे राजकारण करणे योग्य नाही आणि जर कुणी राजकारण करत असेल ते चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयात शनिवारी सायंकाळी पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार सुजय विखे-पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, शहराध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री भारती पवार यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा हे वादग्रस्त आहेत, या प्रश्नावर त्यांनी चौकशी करून कारवाई करू, असे सांगितले. पंतप्रधान निधीतून दिलेल्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क होऊन ही आग लागल्याच्या आमदार रोहित पवार यांनी आरोप केला होता. या आरोपाकडे लक्ष वेधले असता भारती पवार म्हणाल्या, अशा दुर्घटनेवेळी आम्ही राजकारण करत नाही. जे राजकारण करत असतील ते दुर्दैवी आहेत.
काय आहे घटना?
जिल्हा सामान्य रुग्णालयातील ICU कोरोना कक्षाला शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ५० ते ८५ वयोगटातील आहेत. आयसीयू कक्षामध्ये कोरोनाची लागण झालेल्या २५ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यामध्ये सात जण सात जण अत्यंत गंभीर असून राहिलेल्या २० जणांना तातडीने इतर कक्षांमध्ये हलवण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन देण्याची कार्यवाही तातडीने सुरू झाली.पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज दुपारी जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे रविवारी येणार नगरमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.