ऐ दिल है मुश्किलला विरोध कायम
By admin | Published: October 22, 2016 01:38 AM2016-10-22T01:38:13+5:302016-10-22T01:38:13+5:30
ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाला मनसेचा विरोध कायम असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे. मुंबईसह स्थानिक स्वराज संस्था निवडणुका आणि पाकिस्तानी कलाकारांच्या
मुंबई : ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाला मनसेचा विरोध कायम असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे. मुंबईसह स्थानिक स्वराज संस्था निवडणुका आणि पाकिस्तानी कलाकारांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शुक्रवारी मनसेचे नेते, उपाध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्याबरोबर ‘कृष्णकुंज’ येथे अचानक बैठक घेतली. या वेळी राज यांनी आंदोलनाचे कौतुक करतानाच विरोध कायम ठेवण्याची सूचना दिल्याचे बैठकीस उपस्थित असणाऱ्या नेत्याने सांगितले.
राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांकरिता कशा प्रकारची रणनीती असावी, निवडणुकीत जास्तीतजास्त यश
कसे मिळवता येईल यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. स्थानिक समस्यांवर भर देत प्रचार करावा, अशी सूचना राज ठाकरे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या वेळी ‘ऐ दिल है मुश्किल’बाबतही चर्चा झाली. पाकिस्तानी कलाकारांच्या चित्रपटाला विरोध कायम ठेवावा. तसेच याबाबत सोशल मीडियावर येणाऱ्या पोस्टची माहिती घेत राहावी आणि लक्ष द्यावे अशा सूचनाही दिल्या.
अमेय खोपकर यांनी बैठकीबाबत सांगितले की, अंतर्गत बैठक होती. यात निवडणुकांबाबत चर्चा झाली. करन जोहरच्या चित्रपटाला मनसेचा विरोध कायम असून, हा विरोध आम्ही आणखी तीव्र करणार आहोत. एक आमदार असलेल्या पक्षाच्या आंदोलनामुळेच केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत धाव घ्यावी लागली. आम्ही आणखी काय करतो ते दाखवून देऊ, असेही अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)