एड्स हेल्पलाइनचा ‘मराठी’ला ठेंगा
By admin | Published: January 12, 2015 03:34 AM2015-01-12T03:34:52+5:302015-01-12T03:34:52+5:30
‘नमस्कार, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटन आपका एड्स हेल्पलाइन मे स्वागत करता है’. हिंदी के लिए १, फॉर इंग्लिश २, मराठीसाठी ३, अन्य भाषांसाठी ४ आणि पुन्हा ऐकण्यासाठी ९ दाबा
पूजा दामले, मुंबई
‘नमस्कार, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटन आपका एड्स हेल्पलाइन मे स्वागत करता है’. हिंदी के लिए १, फॉर इंग्लिश २, मराठीसाठी ३, अन्य भाषांसाठी ४ आणि पुन्हा ऐकण्यासाठी ९ दाबा.... हे रेकॉर्डिंग १०९७ या क्रमांकावर फोन केल्यास ऐकू येते. पण पुढे जात ३ हा मराठीचा पर्याय निवडल्यास कोणताही समुपदेशक फोन उचलत नाही. वारंवार प्रयत्न केल्यानंतर हिंदी भाषिक समुपदेशक फोन उचलतो. ‘लोकमत’ प्रतिनिधींनी वेगवेगळ्या वेळेस या हेल्पलाइनवर ९ वेळा कॉल्स केले. पण, एकदाही मराठी समुपदेशकाशी बोलणे होऊ शकले नाही. दोन वेळा तर चक्क ‘मराठी नहीं’ असे सांगितले. तर काहीवेळा मराठी समुपदेशकाकडे फोन देतो, असे सांगून फोन वेटिंगवर टाकण्यात आले.
१ डिसेंबर २०१४ रोजी ‘नॅको’ आणि पिरामल स्वास्थ्य यांच्या संयुक्त विद्यमाने एड्सविषयी सामान्यांना माहिती मिळावी म्हणून राष्ट्रीय हेल्पलाइन (१०९७) सुरू करण्यात आली आहे. देशपातळीवर सुरू झालेल्या या हेल्पलाइनवर मराठीसह एकूण आठ भाषांमध्ये माहिती मिळणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. पण, हेल्पलाइन सुरू होऊन एक महिना १० दिवस उलटूनही या क्रमांकावर मराठीत कवडीची माहिती उपलब्ध होत नाही.
एड्स कशामुळे होतो, एड्सची तपासणी कुठे करता येईल, असे नेहमीचे प्रश्न विचारल्यावर हिंदी भाषिक समुपदेशकांनी उत्तरे देण्यास सुरुवात केली. पण, हिंदी नीट समजत नाही, मराठीमध्ये सांगू शकता का? असे विचारल्यावर ‘अब नही बाद में फोन करो, मराठी आदमी अभी नही है’, अशी उत्तरे दिली. पण, मराठीत उत्तर हवे असल्यास नक्की कोणत्या वेळी फोन करायचा याचे ठोस उत्तर एकदाही मिळालेले नाही. तर, जनजागृतीसाठी पथनाट्य ठेवायचे असल्यास कुठे संपर्क करायचा? असे विचारल्यावर ‘हिंदी में बात किजीए’, असे सांगण्यात आले. पण शेवटपर्यंत नेमके उत्तर मिळालेच नाही.
एड्ससाठीची हेल्पलाइन २४ तास सुरू असते. आत्तापर्यंत ९० हजार कॉल्स या हेल्पलाइनवर आले आहेत. या हेल्पलाइनसाठी चार मराठी समुपदेशक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असतात. ‘साधन’ हेल्पलाइनवर मराठीमध्ये माहिती मिळते. ‘साधन’वर मराठी भाषिकांचे कॉल्स येतच असतात. ही हेल्पलाइन सध्या राष्ट्रीय हेल्पलाइनशी जोडण्याचा विचार सुरू आहे. मराठीमध्ये प्रश्न विचारल्यास मराठीमध्ये उत्तर मिळते, असा दावा हेल्पलाइनचे कामकाज पाहणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांनी केला आहे. रोज अनेक कॉल्स येत असतात, त्यांना योग्य ती माहिती दिली जाते. पण, तुम्ही सांगता त्याप्रमाणे काही होत असल्यास त्यात लक्ष घातले जाईल, असे नाव न छापण्याच्या अटीवर मुख्य अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.