‘टीबी वॉर्ड’च्या जागेवर ‘एम्स’

By admin | Published: August 24, 2014 01:17 AM2014-08-24T01:17:01+5:302014-08-24T01:17:01+5:30

देशात नव्याने कार्यन्वित होणाऱ्या चार ‘एम्स’पैकी (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) एक नागपुरातील २०० एकर जागेवर होणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या

'AIIMS' in 'TB Ward' | ‘टीबी वॉर्ड’च्या जागेवर ‘एम्स’

‘टीबी वॉर्ड’च्या जागेवर ‘एम्स’

Next

मेडिकलच्या परिसरात साकारणार रुग्णालय : लघुसिंचन विभागाच्या जागेवर कॉलेज
नागपूर : देशात नव्याने कार्यन्वित होणाऱ्या चार ‘एम्स’पैकी (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) एक नागपुरातील २०० एकर जागेवर होणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) टीबी वॉर्ड परिसर, अजनी येथील मेडिकल वसाहत व कारागृहामागील परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंजुरीसाठी या जागेचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि नंतर मंत्रिमंडळात पाठविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
‘एम्स’ सुरू करण्याबाबत शासनस्तरावर शनिवारी रविभवन येथे बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘एम्स’ उभारण्यासाठी सहा ते सात जागा सुचविण्यात आल्या होत्या. वर्धा रोडवरील केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र परिसरातील जागेसह अमरावती मार्ग, पूर्व नागपूर, हिंगणा रोडवरील एमआयडीसी परिसर व मेडिकलच्या टीबी वॉर्डाची जागा होती. या सर्वांवर चर्चा झाल्यानंतर मेडिकलच्या टीबी वॉर्डपरिसरातील जागेला प्राधान्य देण्यात आले. टीबी वॉर्डाच्या सुमारे ५५ एकर जागेवर एम्स रुग्णालय, मध्यवर्ती कारागृहामागील व लघु सिंचन विभागाची मिळून सुमारे १३० एकर जागेवर जिथे सागवनाची झाडे व मोकळा परिसर आहे तिथे कॉलेज तर अजनी रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या मेडिकलची वैद्यकीय वसाहतीच्या १७ एकर जागेवर वसतिगृह व डॉक्टरांचे निवासस्थान उभारण्याचे प्रस्तावित राहील. एम्समुळे दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ‘एम्स’चा फायदा विदर्भच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेशातील रुग्णांना होईल. सोबतच वैद्यकीय क्षेत्रातल्या संशोधनालादेखील चालना मिळेल. गेल्या अनेक वर्षांपासून कोमात गेलेल्या मेडिकल टुरिझमलादेखील नवसंजीवनी मिळेल. या प्रास्ताविक जागेच्या मंजुरीचा प्रस्ताव लवकरच वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्यांच्या मंजुरीनंतर मंत्रीमंडळा समोर जाईल. या प्रक्लपासाठी केंद्रसरकारने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यसरकारकडून एक रुपयाची मदत घेतली जाणार नाही. बैठकीला आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर देशमुख, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सहसचिव संदीपकुमार नायक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सचिव मनिषा म्हैस्कर, मेयोचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे व डॉ. कृष्णा कांबळे उपस्थित होते.
१२०० खाटांचे एम्स
गडकरी म्हणाले, पुण्यातील ‘एम्स’ हॉस्पिटलचे बांधकाम ‘चार एफएसआय’ (चटई क्षेत्र) नुसार झाले आहे. त्याच धर्तीवर नागपुरातील एम्सचे बांधकाम होईल. यात १२०० खाटा राहतील. सुमारे १५०० डॉक्टरांचा समावेश राहील. एमबीबीएसच्या १५० जागा देण्यात येईल. हॉस्पिटलची जागा कमी असल्याने भूगिमत पार्किंगची सोय करण्यात येईल. अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने हे रुग्णालय सज्ज असणार आहे. यामुळे मेडिकल, मेयोवरील रुग्णाचा ताण कमी होईल.
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची पाठ
वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘एम्स’ सुरू करण्याच्या या बैठकीला पाठ दाखविली. यामुळे उलट-सुलट चर्चेला पेव फुटले आहे. ही बैठक शासनाची नव्हे तर गडकरी यांची होती, यामुळे ते आले नसल्याची माहिती आहे.

Web Title: 'AIIMS' in 'TB Ward'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.