पूर्व द्रुतगती मार्गावर आॅइल टँकर पेटला
By admin | Published: August 6, 2015 01:43 AM2015-08-06T01:43:41+5:302015-08-06T01:43:41+5:30
गोदीतून डिझेल भरून ठाण्याच्या दिशेने निघालेल्या डिझेल टँकरचा पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंडनजीक अपघात झाला. यामध्ये चालक अमरनाथ यादव
मुंबई: गोदीतून डिझेल भरून ठाण्याच्या दिशेने निघालेल्या डिझेल टँकरचा पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंडनजीक अपघात झाला. यामध्ये चालक अमरनाथ यादव (४५) आणि क्लीनर अमरनाथ सरोज (३५) हे दोघेही जळून खाक झाले. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांची रांग लागली होती.
पवई येथील रहिवासी असलेला यादव घाटकोपर येथील लिबर्टी कंपनीमध्ये चालक म्हणून काम करीत होता. बुधवारी गोदीतून भरलेले डिझेल रिफाइन करण्यासाठी शहापूर येथे जाण्यास तो निघाला होता. वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्याचा टँकरवरचा ताबा सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकली. अपघातातून कसेबसे सावरणार तोच टँकरने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली. आगीवर नियंत्रण आणले तरीही रस्त्यावर पसरलेल्या डिझेलमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही वेळेसाठी वाहतूक थांबवून दुसऱ्या मार्गाने वळविण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)