“मनोज जरांगे खूप प्रामाणिक अन् निष्ठावंत”; इम्तियाज जलील यांनी केले तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 10:07 AM2024-01-28T10:07:11+5:302024-01-28T10:07:40+5:30

Maratha Reservation: इम्तियाज जलील म्हणतात, मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे पाहिले तर, एका गोष्टीची खंत वाटते की...

aimim leader imtiaz jaleel praises manoj jarange over maratha reservation | “मनोज जरांगे खूप प्रामाणिक अन् निष्ठावंत”; इम्तियाज जलील यांनी केले तोंडभरून कौतुक

“मनोज जरांगे खूप प्रामाणिक अन् निष्ठावंत”; इम्तियाज जलील यांनी केले तोंडभरून कौतुक

Maratha Reservation: आरक्षणाचा अवघड लढा जिंकत विजयाचा गुलाल उधळूनच 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत विजयी मुद्रेने मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजातील बांधव आपापल्या गावी परतले. यावरून आता राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी या यशस्वी लढ्याबाबत मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक केले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना जलील म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हा एक सामान्य माणूस आहे. तरी त्याच्यामागे इतके लोक का उभे राहिले? त्याचा प्रामाणिकपणा, त्याची निष्ठा हीच या लोकांना एकत्र आणण्याचे प्रमुख कारण आहे. मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचे आहे, ही मनोज जरांगेंची भावनाच लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते. त्यांना मोठे यश मिळालं आहे. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो, असे जलील यांनी सांगितले.

मनोज जरांगे खूप प्रामाणिक अन् निष्ठावंत

मनोज जरांगे हे खूप प्रामाणिक आणि निष्ठावंत आहेत. एका छोट्याशा गावातील एक सामान्य माणूस आंदोलन करू लागला आणि त्याच्यामागे लाखोंच्या संख्येने लोक जेव्हा उभे राहतात तेव्हा एक संदेश जातो की, आता लोकांचा राजकीय नेत्यांवरचा, पुढाऱ्यांवरचा विश्वास उडाला आहे, अशी टीका जलील यांनी केली. मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे पाहिले की, मला एका गोष्टीची खंत वाटते की, आमचे लोक असे एकत्र येत नाहीत. मला वाटतं की, आमच्या समाजातील लोकांनीही त्यांच्यातले राजकीय मतभेद विसरून एकत्र यावे. आपसातले वाद मिटवून एकत्र आलो तर आमच्या अनेक मागण्या आम्ही पूर्ण करू शकतो. सर्वच समाजांनी मनोज जरांगेंकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे जलील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जारी केलेला हा अध्यादेश नसून केवळ मसुदा आहे. त्यावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. त्यानंतर त्याचे भवितव्य ठरेल. मात्र, अशा प्रकारची कार्यवाही झाल्यास केवळ ओबीसीच नव्हे तर दलित आणि आदिवासी समाजाचेदेखील आरक्षण धोक्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ म्हणाले.
 

Web Title: aimim leader imtiaz jaleel praises manoj jarange over maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.