'मोदीजी, तुम्ही कागदपत्रं मागायला आलात, तर कब्रस्तानात घेऊन जाईन'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 03:41 PM2020-01-29T15:41:18+5:302020-01-29T15:42:00+5:30
सीएएविरोधात एमआयएमची सभा; मोदी, शहांवर थेट शरसंधान
मुंबई: मी याच मातीत जन्माला आलो आणि याच मातीत दफन होईन, अशा शब्दांत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतल्या सभेत सुधारित नागरिकत्व कायद्याला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं. मोदीजी, ज्या दिवशी माझ्याकडे कागदपत्रं मागायला याल, तेव्हा मी तुम्हाला माझे आजोबा, वडिलांना दफन करण्यात आलेल्या कब्रस्तानात घेऊन जाईन. तिथली माती तुम्हाला देईन आणि तुम्हाला सांगेन की हीच माझी कागदपत्रं आहेत. याच मातीत मी जन्माला आलो आणि याच मातीत मी दफन होईन, असं जलील म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काल मुंबईत एमआयएमची सभा झाली.
दिल्लीतल्या शाहीन बागेत सध्या मुस्लिम महिलांचं सीएए, एनआरसीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यावर भाष्य करताना जलील यांनी मोदी सरकारला थेट इशारा दिला. आमच्या घरातल्या बुरखाधारी महिला आज रस्त्यावर उतरल्यानं तुम्हाला भीती वाटत आहे. जेव्हा हिजाब घातलेल्या महिला घराबाहेर पडतात, तेव्हा क्रांती घडते हा आमचा इतिहास आहे. आमच्या माता बहिणींनी प्रत्येक शहरात एक शाहीन बाग तयार केली आहे. आम्ही त्यांना सलाम करतो. त्यांचं सामर्थ्य एकदा आजमावून पाहा आणि जेव्हा घरातले इतर बाहेर पडतील, तेव्हा काय होईल याचा विचार करा, असं जलील म्हणाले.
'मोदीजी, अमित शहाजी तुम्ही आमच्याकडे आमच्या प्रामाणिकपणाचे पुरावे मागता. तुम्ही आमच्याकडून मशीद हिसकावून घेतलीत. तेव्हा आम्ही नाराज झालो. मात्र इतकं मोठं आंदोलन आम्ही केलं नाही. तुम्ही काश्मीरमध्ये अत्याचार केलेत. तेव्हादेखील आम्ही नाराज होतो. मात्र आम्ही आंदोलन केलं नाही. तिहेरी तलाकच्या नावाखाली तुम्ही शरियतसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केलात. तेव्हाही आम्ही नाराज होतो. मात्र इतक्या मोठ्या आंदोलनासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. मात्र आता तुम्ही या देशापासून आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केलात, तर असं वातावरण तुम्हाला संपूर्ण देशात पाहायला मिळेल, अशा शब्दांत जलील यांनी सीएएविरोधात तीव्र आंदोलन सुरुच राहील असा अप्रत्यक्ष इशारा दिला.