ऐन दिवाळीत आदिवासीवाडी अंधारात
By admin | Published: November 2, 2016 02:40 AM2016-11-02T02:40:15+5:302016-11-02T02:40:15+5:30
ऐन दिवाळीत पौध आदिवासी वाडीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने शेकडो कुटुंबांना दिवाळी अंधारात काढावी लागली आहे.
मोहोपाडा : ऐन दिवाळीत पौध आदिवासी वाडीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने शेकडो कुटुंबांना दिवाळी अंधारात काढावी लागली आहे.
आदिवासी वाडीतील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी वीज वितरण विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र महिन्याभरापासून संबंधित अधिकाऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर दुुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अदिवासी बांधव दुर्गम अशा भागात वास्तव्य करतात. याठिकाणी सर्पदंश, विंचूदंशाच्या घटना वारंवार घडत असतात. अशा वेळी रात्रीच्या वेळी विजेची नितांत गरज असते. मूलभूत सुविधांपासून नेहमीच वंचित राहणाऱ्या आदिवासी बांधवांना ऐन दिवाळीतही अंधारात राहावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. याआधी नवरात्रौत्सवातही ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला होता. तेव्हापासून गावात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याबाबत तक्रार केली असता, लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मर बसविला जाईल, अशी आश्वासने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
दिवाळीनिमित्त अनेक आदिवासीवाड्यामध्ये फराळवाटप करण्यात येते मात्र पौध आदिवासी बांधवांना अंधारात राहावे लागले. खालापूर तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस नरेश पाटील यांनी वाडीत वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.