वातानुकूलित बसचे ‘बेस्ट’ दर
By Admin | Published: June 13, 2016 03:42 AM2016-06-13T03:42:40+5:302016-06-13T03:42:40+5:30
वातानुकूलित बसच्या तिकीटदराच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन विभागाने मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी दिली.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका परिवहन (एमबीएमटी) विभागात येऊ घातलेल्या वातानुकूलित बसच्या तिकीटदराच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन विभागाने मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी दिली. हे दर बेस्टच्या तिकीटदरानुसारच निश्चित होणार असल्याची माहिती उपायुक्त (मुख्यालय) विजयकुमार म्हसाळ यांनी ‘लोकमत’ला दिली.
अडीच वर्षांपासून पालिकेने प्रादेशिक परिवहन विभागाकडे तिकीटदराच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. रखडलेल्या मंजुरीचे वृत्त ‘लोकमत’ने १७ मे रोजीच्या ‘हॅलो ठाणे’मध्ये प्रसिद्ध केले होते. त्याची दखल राज्याच्या परिवहन विभागाने घेत इतर पालिकांच्या परिवहन विभागाच्या तिकीटदराच्या प्रस्तावावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत पालिकेच्या परिवहन विभागाच्या वातानुकूलित तिकीटदराच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन विभागाने तत्त्वत: मान्यता दिली. हा दर बेस्टखेरीज इतर पालिकांच्या वातानुकूलित सेवेच्या तिकीटदराच्या तुलनेत सुमारे २५ टक्के अधिक आहे. त्याऐवजी थेट बेस्टच्या धर्तीवरच दरनिश्चितीचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे उपायुक्तांनी सांगितले. पालिकेने २००५ पासून सुरू केलेल्या परिवहन सेवेत यंदा प्रथमच १० वातानुकूलित बस दाखल झाल्या आहेत. सुरुवातीला पाच बस येणार आहेत. बेस्टच्या वातानुकूलित बसच्या तिकीटदराप्रमाणेच हे दर असतील.
>तिकिटांचे दर पुढीलप्रमाणे
२ ते ४ किमीसाठी ३० रु.
४ ते ६ किमीसाठी ३५ रु.
६ ते १० किमीसाठी ४० रु.
१० ते १४ किमीसाठी ५० रु.
१४ ते १६ किमीसाठी ५५ रु.
१६ ते २० किमीसाठी ६० रु.
२० ते २४ किमीसाठी ७० रु.
२४ ते २६ किमीसाठी ७५ रु.
२६ ते ३० किमीसाठी ८० रु.
३० ते ३४ किमीसाठी ९० रु.
३४ ते ४० किमीसाठी १०० रु.
४० ते ४२ किमीसाठी ११० रु.
४२ ते ४६ किमीसाठी ११५ रु.
४६ ते ५० किमीसाठी १२० रु.