जलद मार्गावर धावण्यासाठी वातानुकूलित लोकल सज्ज, रोज 12 फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2017 07:04 AM2017-07-02T07:04:53+5:302017-07-02T07:05:01+5:30
बहुप्रतिक्षित आणि मुंबईकरांच्या स्वप्न पूर्ण करणाऱ्या लोकलचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. बोरिवली स्थानकातून चर्चगेटसाठी पहिली
महेश चेमटे/ ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - बहुप्रतीक्षित आणि मुंबईकरांच्या स्वप्न पूर्ण करणाऱ्या लोकलचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. बोरिवली स्थानकातून चर्चगेटसाठी पहिली वातानुकूलित लोकल सकाळी 7.30मिनिटांनी रवाना होणार आहे. तर चर्चगेट येथून विरारसाठी पहिली एसी लोकल 8.15 मिनिटांनी रवाना होणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून हे वेळा पत्रक लागू करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
मुंबईकरांचे सुखद आणि आल्हाददायक प्रवासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे वेगाने कार्य करत आहे. त्यानुसार 12 ए सी लोकल फेऱ्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. गर्दी पासून सुटका व्हावी यासाठी सकाळी बोरिवली-चर्चगेट मार्गावर एक सेवा तर पीक-अव्हरमध्ये (सकाळी आणि संध्याकाळी) प्रत्येकी दोन फेऱ्या चालवण्याचा मनसुबा परेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे. चर्चगेट-विरार हे अंतर अवघ्या 1 तास 20 मिनिटात ही लोकल कापणार असून केवळ जलद मार्गावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
सायंकाळी पीक अव्हरमध्ये चर्चगेट येथून 5.30 वाजता विरारसाठी लोकल सोडण्यात येणार आहे. तर विरारवरून परतीचा प्रवास 6.45 मिनिटांनी सुरू करणार आहे.शेवटची लोकल चर्चगेट स्थानकाहून 8 वाजेच्या सुमारास बोरीवली स्थानकासाठी सोडण्यात येणार आहे. शेवटच्या फेरी दिल्यानंतर लोकल साफसफाईसाठी मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये दाखल होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या प्रथम श्रेणीच्या भाड्यापेक्षा 25 टक्के जास्त भाडे या वातानुकूलित लोकलचे असण्याची शक्यता पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली आहे.