आॅन ड्युटी १९२ तास
By admin | Published: March 12, 2016 04:01 AM2016-03-12T04:01:52+5:302016-03-12T04:01:52+5:30
सण-उत्सव, मोठे समारंभ, व्हीआयपी बंदोबस्त अथवा आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना आॅन ड्युटी २४ तास राहावे लागते. वाढत्या कामाच्या ताणामुळे पोलीस वैफल्यग्रस्त, चिडचिडे बनू लागले आहेत.
मनीषा म्हात्रे, मुंबई
सण-उत्सव, मोठे समारंभ, व्हीआयपी बंदोबस्त अथवा आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना आॅन ड्युटी २४ तास राहावे लागते. वाढत्या कामाच्या ताणामुळे पोलीस वैफल्यग्रस्त, चिडचिडे बनू लागले आहेत. अशातच सशस्त्र दलातील कर्मचारी वर्ग गेल्या आठ दिवसांपासून विनाकारण आॅन ड्युटी २४ तास राबत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. केवळ वरिष्ठांच्या मनमानी कारभारामुळे या कर्मचारी वर्गावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून मुंबई पोलीस दलातील सशस्त्र दलाच्या वरळी, ताडदेव, नायगाव, कलिना तसेच मरोळ येथील कर्मचारी वर्गावर कामाचा अतिरिक्त बोजा पडत आहे. रजा न देणे, पगार वेळेवर नाही अशा तक्रारींना तोंड देत असलेल्या सशस्त्र पोलीस दलाच्या नायगाव येथील कर्मचारी वर्गाला गेल्या आठ दिवसांपासून आॅन ड्युटी २४ तास राबविले जात आहे.
४ मार्चपासून ब्रीच कॅण्डी रुग्णालय, माहुल डम्पिंग यार्डसारख्या बंदोबस्ताच्या ठिकाणी प्रत्येकी २ पोलिसांची नेमणूक करण्यात येत आहे. याबाबत कुणाकडे विचारणा केल्यास सशस्त्र पोलीस दलाचे अपर आयुक्त कैसर खालीद यांच्या आदेशाने या ड्युटी लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी खालीद यांच्याकडे विचारणा केली असता, आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. संबंधित पोलीस उपायुक्तांकडे कर्मचारी वर्गाला ड्युटी लावण्याची जबाबदारी असल्याचे खालीद यांचे म्हणणे आहे.
त्यातही जेथे गरज नाही, अशा ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा अडकवून ठेवण्यात आला आहे. ३ मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडील बंदोबस्तात कपात करण्यात आली होती. जास्तीच्या पोलीस बंदोबस्ताची गरज नसल्याने तेथे तैनात असलेल्या २० कर्मचाऱ्यांपैकी १० कर्मचारी कमी करण्यात आले होते. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी वरिष्ठांची फोनाफोनी झाल्याने पुन्हा कपात केलेल्या कर्मचारी वर्गाला तेथे तैनात करण्यात आले.
अशा प्रकारे अनेक ठिकाणी कर्मचारी वर्गाचा अतिरिक्त फौजफाटा पडून आहे. त्यामुळे जेथे गरज आहे अशा ठिकाणी मात्र उर्वरित पोलिसांवर अतिरिक्त ताण पडतो. माहुल डम्पिंग ग्राउंडसारख्या ठिकाणी हातात एसएलआर घेऊन पोलिसांना एक दिवस थांबणेही कठीण
बनते. तरीही जीव मुठीत धरून थांबावे लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
> आपत्कालीन परिस्थिती अथवा ठरावीक बंदोबस्तादरम्यान पोलिसांना आॅन ड्युटी २४ तास राहण्याची वेळ येते. त्यातही जर तो २४ तास काम करत असेल तर दुसऱ्या दिवशी त्याला सुटी दिली जाते. अशात जर कुणाला विनाकारण राबविले जात असेल तर याची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- धनंजय कुलकर्णी, मुंबई पोलीस प्रवक्ते