एअर इंडिया, मुंबई एफसी लढत बरोबरीत
By admin | Published: May 11, 2017 02:39 AM2017-05-11T02:39:11+5:302017-05-11T02:39:11+5:30
रोमांचक झालेल्या सामन्यात १९ वर्षांखालील एअर इंडिया संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करताना, एमडीएफए सुपर डिव्हिजनच्या प्ले आॅफ सामन्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रोमांचक झालेल्या सामन्यात १९ वर्षांखालील एअर इंडिया संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करताना, एमडीएफए सुपर डिव्हिजनच्या प्ले आॅफ सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई एफसी ‘ब’ संघाला १-१ असे बरोबरीत रोखले. दुसरीकडे, मुंबई स्ट्रायकर्स संघाने बँक आॅफ इंडियाचा २-१ असा पराभव करून विजयी आगेकूच केली.
मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (एमडीएफए) मान्यतेने अंधेरी क्रीडा संकुल स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात एअर इंडिया व मुंबई एफसी यांनी तोडीस तोड खेळ ंकरत सामना चांगलाच चुरशीचा केला. सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध खेळ केल्याने रंगत कमी झाली होती.
परंतु १३व्या मिनिटाला राकेश करमारणने गोल करून मुंबई एफसीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या वेळी मुंबई एफसीने मध्यंतरापर्यंत हीच आघाडी कायम राखत नियंत्रण राखले. दुसऱ्या सत्रातही मुंबई एफसीने एअर इंडियाला फारशी संधी दिली नाही. अतिरिक्त वेळेत मात्र, एअर इंडियाने आक्रमक पवित्रा घेत सामन्यात जबरदस्त रंग भरले. अतिरिक्त वेळेच्या सातव्या मिनिटाला आशिष लालगे याने निर्णायक गोल करून एअर इंडियाला बरोबरी साधून दिली.
तसेच, कुपरेज स्टेडियमवर अरनॉल्ड मस्कारेन्हस, अर्सलन हमदुले यांच्या जोरावर मुंबई स्ट्रायकर्सने आक्रमक खेळ करताना बँक
आॅफ इंडियाला २-१ असे नमवले.