Air India Plane Crash: मुलाच्या कर्तृत्वाविषयी आई काय बोलणार?; वैमानिक दीपक साठे यांच्या मातेची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 03:56 AM2020-08-10T03:56:32+5:302020-08-10T03:57:22+5:30
नुकतेच वंदेमातरम् मिशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणताना एअर इंडियाच्या विमानाला केरळच्या कोझिकोडे विमानतळावर अपघात झाला. या अपघातात वैमानिक कॅप्टन दीपक साठे मृत्युमुखी पडले.
नागपूर : माझा मुलगा प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट होता. त्याने देशासाठी प्राण दिला. शेवटच्या वेळी स्वत:चा जीव गमावला पण विमानातील १७० लोकांचे प्राण वाचविले. यापेक्षा मोठी कामगिरी काय असेल? माझ्या मुलाच्या कौशल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या मुलाच्या कर्तृत्वाविषयी आई काय बोलणार? कुणाचेही हृदय हेलावणारी ही भावना आहे नुकतेच विमान अपघातात मरण पावलेले वैमानिक दीपक साठे यांच्या धीरोदात्त मातेची.
नुकतेच वंदेमातरम् मिशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणताना एअर इंडियाच्या विमानाला केरळच्या कोझिकोडे विमानतळावर अपघात झाला. या अपघातात वैमानिक कॅप्टन दीपक साठे मृत्युमुखी पडले. मात्र अखेरपर्यंत त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे विमानातील १७० प्रवाशांचे प्राण वाचविले. मूळचे नागपूरचे असलेले कॅप्टन दीपक साठे यांची गेल्या सहा महिन्यापासून आईवडिलांशी भेट झाली नव्हती आणि नियतीमुळे ती आता कधीच होणार नाही. मुलाच्या आठवणीने हळव्या झालेल्या नीला साठे यांचे अश्रू थांबत नाहीत. मात्र सैनिकाची पत्नी व माता असलेल्या या आईचा धीरोदात्तपणा येथेही दिसून येतो.
मुलाच्या कर्तृत्वाचा गौरव त्यांच्या शब्दात दिसून येतो. ‘पतीने ३० वर्षे सैन्यात सेवा दिली. मोठा मुलगासुद्धा सैन्यातच होता आणि त्याने देशासाठी प्राणार्पण केले. लहान दीपकसुद्धा सर्वोत्कृष्ट होता. वायुसेनेची आठही बक्षिसे घेणारा तो महाराष्टÑातील पहिला अधिकारी होता. एअरफोर्स अकादमीचा टॉपर होता. एवढेच नाही तर अकॅडमीत असताना जलतरण, स्क्वॅॅश, बॅडमिंटन, टेनिस, घोडेसवारी अशा प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली. एअरफोर्सची सगळी बक्षिसे मिळविणारा तो एकमेव होता, असे त्या म्हणाल्या.
त्याने केली सर्वोत्तम कामगिरी - नीला साठे
मरतानाही १७० लोकांचे प्राण वाचवून त्याने सर्वोत्तम कामगिरी केली. नेहमी टॉपर, सुवर्ण पदके मिळविणारा, जगभर विमाने फिरविणाऱ्या माझ्या मुलाने कधीही अहंकार बाळगला नाही. या वयात मुलांना गमावण्याची वेदना आहे पण त्याच्या कामगिरीचा अभिमानही आहे. आणखी मुलाच्या कर्तृत्वाविषयी आई काय बोलणार?’, अशा शब्दात ८३ वर्षाच्या नीला साठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.