औरंगाबाद विमानतळावरून बोर्इंग, एअर बसचे उड्डाण
By admin | Published: January 18, 2016 03:43 AM2016-01-18T03:43:19+5:302016-01-18T03:43:19+5:30
आंतरराष्ट्रीय विस्तारीकरणामध्ये येथील विमानतळाची २,७०० फुटांनी धावपट्टी लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे बोर्इंग ७७७ आणि एअर बस-ए ३३० सारख्या मोठ्या विमानांचे उड्डाण शक्य होणार आहे.
औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय विस्तारीकरणामध्ये येथील विमानतळाची २,७०० फुटांनी धावपट्टी लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे बोर्इंग ७७७ आणि एअर बस-ए ३३० सारख्या मोठ्या विमानांचे उड्डाण शक्य होणार आहे.
विमानतळाच्या विस्तारीकरणानंतर देश-विदेशात थेट मालाची आयात-निर्यात आणि आखाती, युरोपीय देशांमध्ये थेट विमानसेवेचा मार्ग मोकळा होणार आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात होणाऱ्या विदेशी गुंतवणुकीमुळे देश-विदेशातील उद्योगांसाठी आवश्यक असणारी विमानसेवा देण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करणे गरजेचे आहे.
विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी १८२ एकर जमिनीची मागणी प्राधिकरणाकडून सरकारकडे करण्यात आली होती. जमीन भूसंपादित करण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता देण्यात आली आहे. विस्तारीकरणाचा प्रस्ताव तयार असून भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. विस्तारीकरणाचे काम आगामी सहा महिन्यांमध्ये प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)