कुडूस येथील खोसला कंपनीत वायुगळती
By admin | Published: September 1, 2014 02:23 AM2014-09-01T02:23:41+5:302014-09-01T02:23:41+5:30
तालुक्यातील कुडूस परिसरातील खोसला प्रोफाइल या कंपनीत कपडा वॉटरप्रूफिंगसाठी लागणाऱ्या पेंटमध्ये वायुगळती होऊन १७ महिला कामगारांना त्याची बाधा झाली आहे
वाडा : तालुक्यातील कुडूस परिसरातील खोसला प्रोफाइल या कंपनीत कपडा वॉटरप्रूफिंगसाठी लागणाऱ्या पेंटमध्ये वायुगळती होऊन १७ महिला कामगारांना त्याची बाधा झाली आहे. त्यापैकी नऊ महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाण्याच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित महिलांना खुपरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे कंपनी आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.
२६ आॅगस्ट रोजी ही घटना घडली असून कंपनी व्यवस्थापनाने मात्र याबाबत गुप्तता पाळली असून वायुगळती प्रकरणी अद्याप तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही. कविता पाटील, अस्मिता अधिकारी, अर्चना पाटील, सविता ठाकरे, संध्या पाटील, रेश्मी लाड, प्रगती सुरावडे, मीना सिंग, या महिला कामगारांवर ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरित महिलांना घरी पाठविण्यात आले आहे.
कुडूस येथील खोसला प्रोफाइल या कंपीत वॉटरप्रूफिंग कपडा तयार केला जातो. कपड्यावर लावण्यासाठी अॅडजेसिंग पेंट लावताना या पेंटला उग्र वास येऊ लागला व त्यातून वाफाही निघू लागल्या. या वायुगळतीचा त्रास महिला कामगारांना होऊन छातीत दुखणे, मळमळ होणे, घसा, पोटदुखी असा त्रास होऊ लागल्याने त्यांना प्रथम कल्याणी रुग्णालयात दाखल केले. नंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. (वार्ताहर)