चिपीतून विमान 'उडविल्या'शिवाय स्वस्थ बसणार नाही : सुरेश प्रभू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 01:11 PM2019-03-05T13:11:19+5:302019-03-05T13:13:18+5:30
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
सावंतवाडी : चिपी विमानतळाच्या टर्मिनलचे उद्धाटन आज करण्यात येत असून विमान सेवा सुरू केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार नागरी विमानोड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक विरेंद्र म्हैसकर यांना सुंदर विमानतळ उभारण्याचे श्रेय दिले. तसेच उद्योगासाठी आम्ही प्रयत्नशील असून भुमिपूत्रांना रोजगार मिळवून देणार, असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. सी वर्ल्ड प्रकल्पाचा विषय पुढील सहा महिन्यात मार्गी लावणार असल्याची घोषणा केली. कोकणात रेल्वेचे 22 हजार कोटीचे प्रकल्प सुरु असून जिल्ह्यात पोलिस चांगले काम करत असल्याचे सांगत पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन केले.
तत्पूर्वी, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राचे उद्योग धोरण आज मुंबईत जाहीर होणार असल्याचे सांगितले. विमानतळामुळे विकासाला चालना मिळे. आडारीमध्ये प्रकल्प यावेत यासाठी प्रयत्न सुरु असून गोव्यातील उद्योजक आडारी येथे येणार आहेत. त्यामुळे रोजगार वाढीस लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुरेश प्रभू यांनी पुढील दोन- तीन वर्षांत उड्डाण योजनेचा फायदा देशाला होईल. 2022 पर्यंत नव्या भारताची संकल्पना उदयास येणार असल्याचे सांगितले. तसेच रत्नागिरीतील विमानतळ लवकरच कार्यन्वित करणार असल्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले.
या कार्यक्रमावेळी गुजरातमध्ये सुरू असलेल्या पेन्शन योजनेच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. पंतप्रधान जाहीर करत असलेल्या पेन्शन योजनेचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रात होणार असून तब्बल अडीच लाख पेन्शनर्स असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नारायण राणेंचे 'ते' स्वप्नही पूर्ण करू; दीपक केसरकरांचा टोलाhttps://t.co/cXXRRdfLaW@MeNarayanRane#ChipiAirport
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 5, 2019
राणेंच्या स्वप्नपूर्तीसाठी केसरकरांना पाठिंबा
दीपक केसरकर यांनी नारायण राणेंचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची घोषणा केली. हा धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी राणेंचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मंत्री केसरकर यांनी घेतलीय; त्याला माझा पाठींबा जाहीर करत आहे, सिंधुदूर्गच्या विकासाचा गाडा कोणीही थांबवू शकणार नाही, असे सांगितले. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री नारायण राणेही उपस्थित होते.