विमानतळाजवळ पॅराशूट नव्हे तर एअर बलून होते, दोघांना अटक
By admin | Published: May 26, 2015 09:54 AM2015-05-26T09:54:05+5:302015-05-26T11:18:28+5:30
मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळ आढळलेल्या पाच संशयास्पद वस्तू नेमक्या काय होत्या याचा उलगडा अखेर झाला असून ते पॅराशूट नसून मोठे एअर बलून होते अशी माहिती पोलिस चौकशीतून समोर आली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळ आढळलेल्या पाच संशयास्पद वस्तू नेमक्या काय होत्या याचा उलगडा अखेर झाला असून ते पॅराशूट नसून मोठे एअर बलून होते अशी माहिती पोलिस चौकशीतून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान हे एअर बलून सोडण्यात आले होते.
शनिवारी संध्याकाळी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळ पॅराशूटसारख्या पाच वस्तू हवेत उडताना आढळल्या होत्या. एका वैमानिकाने याची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिल्यावर काही वेळेपुरता विमानतळावरील विमानांचे टेक ऑफ व लँडिंग थांबवण्यात आले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली होती व थेट पंतप्रधान कार्यालयानेच या संदर्भात अहवाल मागवला होता. नागरी हवाई उड्डाण महासंचालनालयाचे पथकही चौकशीसाठी आज मुंबईत येणार होते. तर मुंबई पोलिसही या घटनेचा तपास करत होते.
पोलिस चौकशीत हे पॅराशूट नसून एअर बलून असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी एअर इंडिया मैदानावर एका डायमंड कंपनीतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान आयोजकांनी हवेत एअर बलून सोडले होते. विना परवानगी एअर बलून सोडल्याप्रकरणी पोलिसांनी दोघा आयोजकांना अटक केली. या दोघांना आज कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.