वायुगळतीने वरळी नाका परिसरात घबराट
By Admin | Published: July 18, 2014 02:57 AM2014-07-18T02:57:22+5:302014-07-18T02:57:22+5:30
दक्षिण मुंबईतील वरळी नाका परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या वायुगळतीमुळे स्थानिक परिसरात एकच घबराट पसरली
मुंबई : दक्षिण मुंबईतील वरळी नाका परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या वायुगळतीमुळे स्थानिक परिसरात एकच घबराट पसरली. मात्र वेळेवर दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांसह महानगर गॅस लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी यावर नियंत्रण मिळविल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरळी नाका येथील शिवसेना पक्ष कार्यालयाच्या परिसरात गुरुवारी दुपारी महानगर गॅस पाइपलाइनच्या मुख्य लाइनमधून अचानक वायुगळती होऊ लागली. ही घटना समजताच स्थानिकांनी याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. शिवाय दरम्यानच्या काळात येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. कालांतराने अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील वायुगळतीवर नियंत्रण मिळवित स्थानिकांना दिलासा दिला.
दरम्यान, महानगर गॅसकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजीच्या आउटलेटमध्ये छोटासा तांत्रिक बिघाड झाल्याने ही वायुगळती झाली. हा प्रकार लक्षात येताच खबरदारी म्हणून येथील गॅसपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला. शिवाय परिसरही रिकामा करण्यात आला. त्यामुळे जीवित आणि वित्तहानी झालेली नाही. शिवाय कंपनीच्या अभियंत्याच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. (प्रतिनिधी)