ऐश्वर्य हा माझा नव्हे, स्मिताचा मुलगा - जयदेव

By Admin | Published: July 21, 2016 05:48 AM2016-07-21T05:48:36+5:302016-07-21T05:48:36+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्रात ज्याचे थेट नाव आहे, असा त्यांचा एकमेव नातू व स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य हा माझा मुलगा नाही

Aishwarya is not mine, but Jaydev, son of Smita | ऐश्वर्य हा माझा नव्हे, स्मिताचा मुलगा - जयदेव

ऐश्वर्य हा माझा नव्हे, स्मिताचा मुलगा - जयदेव

googlenewsNext


मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्रात ज्याचे थेट नाव आहे, असा त्यांचा एकमेव नातू व स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य हा माझा मुलगा नाही, असे खळबळजनक विधान बाळासाहेबांचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी बुधवारी उच्च न्यायालयात साक्ष देताना केले. जयदेव ठाकरे ऐश्वर्यविषयी पुढील खुलासा करणार, इतक्यात न्यायालयाने ठाकरे कुटुंबीयांमधील ही बाब अत्यंत वैयक्तिक असल्याने पुढील सर्व सुनावणी ‘इन- कॅमेरा’ घेतली. त्यामुळे पत्रकार व अन्य वकिलांना न्यायालयाबाहेर जावे लागले.
बाळासाहेबांनी केलेल्या इच्छापत्रावरून त्यांच्या पश्चात शिवसेना पक्षप्रमुख झालेले उद्धव ठाकरे व जयदेव ठाकरे या त्यांच्या दोन चिरंजीवांमध्ये मालमत्तेच्या वाटणीवरून उद््भवलेल्या वादाच्या प्रकरणावर न्या. गौतम पटेल यांच्यापुढे सुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्यातर्फे त्यांचे ज्येष्ठ वकील रोहित कपाडिया घेत असलेल्या उलटतपासणीत जयदेव यांनी हे विधान केले तेव्हा कामकाजाचे सकाळचे सत्र संपत आले होते. जयदेव यांना ऐश्वर्यविषयी आणखी काही सांगायचे होते, पण न्या. पटेल यांनी त्यांना थांबविले. दुपारच्या सत्राचे कामकाज सुरु करण्यापूर्वी न्या. पटेल यांनी उद्धव व जयदेव यांच्या वकिलांना आपलय चेंबरमध्ये बोलावून घेतले. कोर्टात येऊन न्यायासनावर बसल्यावर त्यांनी ही सुनावणी आता ‘इन कॅमेरा’ करण्यात येत आहे, असे जाहीर केले. त्यानुसार पत्रकार व या केसशी संबंधित नसलेल्या वकिलांना बाहेर जाण्यास सांगून जयदेव यांनी पुढील उलटतपासणी नोंदविण्यात आली. ही उलटतपासणी गुरुवारीही अशाच पद्धतीने पुढे सुरु राहील.
हे खळबळजनक विधान करण्याआधी जयदेव यांनी जी उत्तरे दिली होती त्या अनुषंगाने अ‍ॅड. कापडिया यांनी त्यांना असे विचारले, सन २००४ नंतर तुम्ही (मातोश्री)च्या पहिल्या मजल्यावर कधीच गेला नाहीत?त्यावर जयदेव यांनी असे उत्तर दिले की, चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी कधीतरी त्या मजल्यावर जात असे. मात्र त्या मजल्यावर रात्री कधीच राहिलो नाही. कारण तो मजला बऱ्याच वेळा बंद असायचा. तिथे कोणीतरी राहात होते....
तिथे कोण राहात होते? याची वडिलांकडे कधी चौकशी केली नाही का?, असे विचारता जयदेव म्हणाले, ‘मी साहेबांकडे याविषयी चौकशी केली. तिथे कोणीतरी ऐश्वर्य राहात होता.’
जयदेव यांच्या या वाक्यावर उद्धवचे वकील व त्यांचा चमू आश्चर्यचकित झाला. त्याचबरोबर पत्रकारही आश्चर्यचकित झाले. उद्धवच्या वकिलांनी तोंडावरचे भाव लपवत जयदेव यांना विचारले की, ऐश्वर्य तुमचाच मुलगा आहे ना? त्यावर जयदेव यांनी ठामपणे म्हटले की ऐश्वर्य माझा मुलगा नाही. मला त्याविषयी कधीतरी सांगायचेच होते.... पण त्यांनी पुढे काय सांगितले ते ‘इन कॅमेरा’ कामकाजामुळे समजू शकले नाही. (प्रतिनिधी)
>बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन ‘मातोश्री’ सोडले
बाळासाहेबांनी जानेवारी २०११ मध्ये तयार केलेल्या इच्छापत्रात उद्धव ठाकरे यांच्यानंतर थेट कुणाचे नाव असेल तर ते ऐश्वर्यचे आहे. बाळासाहेबांनी त्याच्या नावावर ‘मातोश्री’चा पहिला मजला केला आहे. मात्र या पहिल्या मजल्यावर जयदेव किंवा स्मिता यांना प्रवेश देऊ नये, अशी अटही बाळासाहेबांनी इच्छापत्राद्वारे घातली आहे. जुन्या मातोश्रीमध्ये जयदेव ठाकरे व स्मिता याच मजल्यावर राहत होते. मात्र स्मिता आणि जयदेव यांच्यातील वाद अधिक वाढू लागल्याने जयदेव यांनी बाळासाहेबांच्या सांगण्यावरून रात्री मातोश्रीवर जाणे बंद केले.नवीन मातोश्रीवर राहायला गेलो त्याच दिवशी रात्री आमच्यात (जयदेव आणि स्मिता) वाद झाला. त्यावर साहेबांनी आताच माझी बायपास सर्जरी झाली त्यामुळे वाद नकोत, असे म्हणत मला यामधून मार्ग निघेपर्यंत कलिनामध्ये राहण्यास सांगितले. घटस्फोट होईपर्यंत म्हणजेच २००४ पर्यंत मी दिवसा बाळासाहेबांना मदत करण्यासाठी मातोश्रीवर जायचो तर रात्री कलिनाला जात होतो.१९९९ मध्ये मी मातोश्रीच्या बाजूलाच असलेल्या डॅल्लस अपार्टमेंटमध्ये राहायला आलो. मात्र त्यावेळी कायमचे मातोश्री सोडायचा माझा विचार नव्हता. ही केवळ तात्पुरती सोय होती. १९९८ मध्ये मला मुलगी झाली त्यानंतर मी माझ्या कुटुंबासमवेत (तिसरी पत्नी अनुराधा आणि मुलगी माधुरी) कधीच मातोश्रीमध्ये राहायला गेलो नाही.२००४ नंतरही मी दिवसा मातोश्रीमध्ये राहायचो आणि रात्री माझ्या घरी परत जायचो. परंतु, बाळासाहेबांची तब्येत ठीक नसल्यावर किंवा त्यांनी रात्री राहण्याचा आग्रह केल्यावर मी त्यांच्याबरोबर दुसऱ्या मजल्यावर राहात असे. ही दिनचर्या बाळासाहेबांच्या मृत्यूपूर्वी एक महिन्यापर्यंत सुरू होती. त्यांच्या मृत्यूच्या एक महिना अगोदर मी मातोश्रीवर रात्री राहायला जाणे सोडले. कारण बाळासाहेब सांगायचे की, माझी तब्येत ठीक नसेल तर मी तुला बोलावून घेईन. फोन जवळ ठेव.
>तिसरा विवाह...
जयदेव आणि स्मिता ठाकरे यांचा घटस्फोट २००४ मध्ये झाला. मात्र, त्यापूर्वीच जयदेव यांनी अनुराधा यांच्याशी तिसरा विवाह केला. या विवाहाला त्यांच्या कुटुंबातील कोणीही हजर का राहिले नाही? या प्रश्नावर उत्तर देताना जयदेव यांनी आपला विवाह इतका अचानक झाला की, कोणालाही बोलावणे जमले नाही, असे सांगितले.

Web Title: Aishwarya is not mine, but Jaydev, son of Smita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.