खडी फोडणा-या हाताने कोरला यशाचा अजिंठा

By admin | Published: February 26, 2015 02:15 AM2015-02-26T02:15:07+5:302015-02-26T02:15:07+5:30

कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत. मात्र मनात शिकण्याची प्रचंड जिद्द

Ajantha of the success of the sculpted hand | खडी फोडणा-या हाताने कोरला यशाचा अजिंठा

खडी फोडणा-या हाताने कोरला यशाचा अजिंठा

Next

ज्ञानेश्वर मुंदे, यवतमाळ
कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत. मात्र मनात शिकण्याची प्रचंड जिद्द. म्हणूनच कुणापुढे हात पसरण्याऐवजी रोजंदारी करून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अनेकदा शिक्षणात खंड पडेल, अशी स्थिती होती. पण जिद्दीने त्याने या सर्व गोष्टींवर मात केली आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात या गरीब विद्यार्थ्याने ‘सुवर्ण’ छाप उमटविली.
नेर तालुक्यातील आजंती या छोट्याशा गावातील या विद्यार्थ्याचे नाव आहे राजदीप देवीदास उताने. रसायनशास्त्रात चार सुवर्णपदके प्राप्त करून राजदीपने शासकीय विज्ञान संस्था, नागपूरच्या गौरवात भर टाकली. हे यश सहजासहजी मिळाले नाही. खडी फोडणाऱ्या हातांचे पुस्तकांशी घट्ट नाते जुळले अन् त्यातूनच त्याने यशाचा अजिंठा कोरला.
राजदीपच्या यशाचे कौतुक करण्यासाठी त्याच्या आईवडिलांकडे शब्द नाहीत. दीक्षान्त समारंभात राजदीपचे कुटुंब तो सुवर्णक्षण आसवांच्या साक्षीने आपल्या डोळ्यात साठवत होते. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. खडी फोडणे, खोदकाम करणे, शेतीकाम, गवंडीकाम करून राजदीपने आपला शैक्षणिक खर्च भागविला. ग्रामपंचायतीच्या दिव्याखाली बसून बारावी पास झाला.
राजदीपच्या डोळ्यातील स्वप्नांना आकार देण्यासाठी त्याचा मोठा भाऊ अमरने त्याचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. वर्धा येथे बायोटेक्नॉलॉजीला राजदीपला प्रवेश मिळाला. आॅटोरिक्षा चालवून आणि प्रसंगी रोजमजुरी करून अमर त्याला महिन्याला तीन हजार रुपये पाठवायचा. सतत पाच वर्षे अमरने पैसे पाठविले. आजी व काकांनी सुद्धा मदतीचा हात दिला. पदवीनंतर राजदीप नागपुरात आला. त्याच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारू लागल्या. शासकीय विज्ञान संस्थेत रसायनशास्त्रात त्याने एमएससीसाठी प्रवेश घेतला.
प्रा. डॉ. सुजाता देव यांनी त्याच्या प्रतिभेला पैलू पाडले. नेट
उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. दिवसाचे बारा-बारा तास अभ्यास करून रसायनशास्त्रात त्याने लक्षणीय यश संपादन केले.
राजदीप आता पी़एचडी़चा अभ्यास करतोय. कर्करोग आणि एचआयव्ही प्रतिबंधक औषधांवर त्याचे संशोधन सुरू आहे. ग्रामीण तरुणांना प्रेरणादायी असेच त्याचे यश आहे. त्या दिवशीचा दीक्षान्त सोहळा राजदीपच्या यशाने अधिकच देखणा झाला होता.

Web Title: Ajantha of the success of the sculpted hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.