अजित डोवाल यांच्या मुंबईत गाठीभेटी; शिंदे, फडणवीस यांच्याशी चर्चा, राज्यपालांचीही सल्लामसलत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 09:20 AM2022-09-04T09:20:00+5:302022-09-04T09:21:07+5:30
आधी राजभवनवर राज्यपाल कोश्यारी आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन डोवाल यांनी सल्लामसलत केली.
मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली.
मुंबई ही नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर राहिली आहे. मुंबईसह राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती तसेच या संदर्भात राज्य सरकारने घ्यावयाची खबरदारी या संदर्भात डोवाल यांनी शिंदे, फडणवीस आणि पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
आधी राजभवनवर राज्यपाल कोश्यारी आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन डोवाल यांनी सल्लामसलत केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेत त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या, अशी माहिती आहे.