अजित पवारांमुळे महाराष्ट्रावर साडेतीन लाख कोटींचा बोजा
By admin | Published: February 15, 2017 03:18 AM2017-02-15T03:18:14+5:302017-02-15T03:18:14+5:30
महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आर्थिक खाईत लोटले. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा डोंगर वाढत गेला.
वरवंड (जि. पुणे) : महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आर्थिक खाईत लोटले. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा डोंगर वाढत गेला. भाजपा आणि मित्रपक्षाने सत्ता हाती घेतला त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या तिजोरीवर साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज केले होते, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
वरवंड (ता. दौंड) येथे रासपा, भाजपा, आरपीआय युतीच्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. एरवी शिवसेनेवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मात्र शिवसेनेबाबत या सभेत ब्र काढला नाही.
दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपा आणि मित्र पक्षाचे राज्य येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘अजित पवार यांनी दिवसभर नारळ फोडायचे आणि रात्री माणसे तोडायचे एवढेच काम केले आहे. मात्र, आम्ही माणसं जोडण्याचे काम केले आहे.’ दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी धनगर आणि मराठा समाजाला लवकरच आरक्षण दिले जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)