अजित पवार यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा नाही
By admin | Published: September 25, 2015 03:32 AM2015-09-25T03:32:55+5:302015-09-25T03:32:55+5:30
बाळगंगा सिंचन प्रकल्पातील कथित गैरव्यवहार प्रकरणी माजी पाटबंधारे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही
मुंबई : बाळगंगा सिंचन प्रकल्पातील कथित गैरव्यवहार प्रकरणी माजी पाटबंधारे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही, असे ईडीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
बाळगंगा सिंचन प्रकल्पासंदर्भात माजी पाटबंधारे मंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) खुली चौकशी सुरू आहे; मात्र अद्याप त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. शिवाय, नजीकच्या काळात समन्स बजावण्याची शक्यता नाही. त्यांच्याकडून काही माहिती हवी असल्यास त्यांच्या प्रतिनिधींकडून मागवण्यात येईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची आम्हाला केवळ उत्तरे मिळणे अपेक्षित आहे, त्यांची वैयक्तिक उपस्थिती नव्हे. आमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तर आम्ही स्पष्टीकरण मागतो. आम्ही याबाबत कसलीही घाई करणार नाही. त्यांना उत्तरे देण्यासाठी पुरेसा वेळ देणार आहोत, असेही दीक्षित यांनी सांगितले. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करीत असून, त्यांनीही अजित पवार यांना दोषी धरलेले नाही. एसीबीने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने ईसीआयआर दाखल केला असून, त्यात केवळ कंत्राटदार आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, बाळगंगा सिंचन घोटाळ्यातील कंत्राटदार एफ.ए. इंटरप्रायझेसला २५ कोटी व त्यापेक्षा अधिकची कंत्राटे मिळावीत यासाठी वर्ग ‘अ’ दर्जा दिल्याबद्दलची फाईल गहाळ
करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणी सा.बां. विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अनिलकुमार गायकवाड यांच्यासह एफ.ए. इंटरप्रायझेसच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायब करण्यात आलेल्या फायलीवर सा.बां. विभागातील अधिकाऱ्यांचे नोटिंग होते, त्याचा तत्कालीन पाटबंधारेमंत्री अजित पवार यांच्याशी कसलाही संबंध नाही, असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)