सुनावणीला अजित पवार, मोहिते-पाटील यांचा आक्षेप
By Admin | Published: June 9, 2016 01:10 AM2016-06-09T01:10:56+5:302016-06-09T01:10:56+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दिलीप सोपल आणि दिलीप माने यांनी आक्षेप घेतला आहे.
पुणे : अपात्र संचालकप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दिलीप सोपल आणि दिलीप माने यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांची सुनावणी विभागीय सहनिबंधक संतोष पाटील यांच्यासमोर सुरू आहे. राज्य शासनाने या संदर्भात काढलेला वटहुकूम तयार करण्यात पाटील यांचा सहभाग असल्याने त्यांच्यासमोर सुनावणीला त्यांनी विरोध केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ जूनला होणार आहे. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले असेल, तर त्या संचालक मंडळावरील व्यक्तींना अन्य कोणत्याही बँकेच्या संचालक मंडळावर पुढील १० वर्षे काम करता येणार नाही, असा वटहुकूम राज्य सरकारने काढला आहे. त्यानुसार अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल आणि दिलीप माने हे राज्य सहकारी बँक व जिल्हा बँकांवर असताना त्यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते आणि सध्या हे सर्व विविध बँकांच्या संचालक मंडळावर आहेत. या वटहुकमामुळे या सर्वांचे संचालकपद धोक्यात आले आहे. या अपात्र संचालक प्रकरणाची सुनावणी विभागीय सहनिबंधक संतोष पाटील यांच्यासमोर सुरू आहे. तत्पूर्वी, वटहुकमासंबंधीची कागदपत्रे मिळण्यासाठी या सुनावणीला मुदतवाढ देण्याची मागणी या सर्वांच्या वकिलांनी केली होती. त्यानुसार त्यांना मुदतवाढही देण्यात आली. दरम्यान, वटहुकूम काढण्याच्या प्रक्रियेत संतोष पाटील यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांच्यापुढेच सुनावणी घेण्यास
आक्षेप असल्याचे अजित पवार यांच्या वकिलांनी सांगितले. आता पुढील सुनावणी १३ जून रोजी होईल.