महायुतीत वादाची ठिणगी: 'एकनाथ शिंदेसाहेब शिवतारेंना आवरा, अन्यथा...'; मिटकरींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 08:17 PM2024-03-11T20:17:48+5:302024-03-11T20:20:28+5:30

विजय शिवतारे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांवर आक्रमक टीका करत आपण या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Ajit Pawar NCP MLC Amol Mitkari has warned Shiv Sena eknath shinde | महायुतीत वादाची ठिणगी: 'एकनाथ शिंदेसाहेब शिवतारेंना आवरा, अन्यथा...'; मिटकरींचा इशारा

महायुतीत वादाची ठिणगी: 'एकनाथ शिंदेसाहेब शिवतारेंना आवरा, अन्यथा...'; मिटकरींचा इशारा

NCP Amol Mitkari ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. असं असलं तरी बारामतीची जागा राष्ट्रवादीकडेच जाणार, हे जवळपास स्पष्ट आहे. मात्र या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. विजय शिवतारे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांवर आक्रमक टीका करत आपण या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता अजित पवार यांच्या पक्षाचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

अमोल मिटकरी यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही विजय शिवतारेंना आवरा. त्यांनी बोलण्यात हलकटपणाचा कळस केला आहे. महायुतीसोबत राहून जर दादांविरुद्ध बोलण्याचा उन्मत्तपणा ते करत असतील तर आमचाही नाईलाज होईल," असा इशारा आमदार मिटकरी यांनी दिला आहे.

या मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. या अनुषंगाने सुनेत्रा पवार या मागील काही आठवड्यांपासून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. अशा स्थितीत महायुतीत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने महायुतीत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

अजित पवारांना आव्हान देताना विजय शिवतारे काय म्हणाले?

एका कार्यक्रमात बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, "लोकांसाठी मी अनेकांशी पंगा घेतला. लोकसभेची निवडणूक समोर आहे, सुप्रिया ताई, सुनेत्रा ताई असं सुरू आहे. बारामती लोकसभा हा कोणाचा सातबारा नाही. बारामतील लोकसभा मतदारसंघात  पुरंदर, भोरचाही खासदार पाहिजे. आम्ही का म्हणून यांना १०-१० वेळा मतदान करायचं? आम्हाला काहीच मिळालं नाही, याच ठिकाणी अजित पवार यांनी विजय शिवतारेंचा अपमान केला होता.आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे," अशा शब्दांत शिवतारे यांनी अजित पवारांना आव्हान दिलं आहे.

दरम्यान, "या मतदारसंघात ६ लाख ८६ हजार मतदान पवारांचं आहे आणि ५ लाख ८० हजार पवार विरोधकांचं मतदान आहे. ६ लाख ८६ हजार मतांमध्ये ते दोघे असतील आणि ५ लाख ८० हजारांमध्ये एकटा विजय शिवतारे असेल. ही लढाई आता आरपारची लढायची असा मी निर्णय घेतला आहे," असंही  शिवतारे म्हणाले.
 

Web Title: Ajit Pawar NCP MLC Amol Mitkari has warned Shiv Sena eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.