माफी मागितल्यामुळे अजित पवार, विखे-पाटील, धनंजय मुंडे त्रिकूट बेरोजगार - उद्धव ठाकरे
By Admin | Published: October 3, 2016 08:30 AM2016-10-03T08:30:16+5:302016-10-03T08:30:16+5:30
अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे हे त्रिकूट पुढचे काही दिवस तरी बेरोजगार अवस्थेत फिरताना दिसेल अशी उपरोधक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे वगैरे विरोधी पक्षांतील बुळबुळीत लोकांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे. ‘व्यंगचित्रप्रकरणी ‘माफी माफी’ असे ते शिवसेनेच्या नावाने ‘खडे’ फोडीत होते, पण आम्ही समस्त मराठा समाजाच्या मायभगिनींपुढे विनम्र नतमस्तक झालो. घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याने आमच्या नावाने ‘खडे’ फोडणार्या या त्रिकुटाच्या दाताखाली खडे आले व त्यांचे दात पडले. या मंडळींच्या तोंडचा राजकीय घासच अशा प्रकारे काढून घेतल्याने पुढचे काही दिवस तरी हे त्रिकूट बेरोजगार अवस्थेत फिरताना दिसेल अशी उपरोधक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे.
आता आधी केलेल्या पापाचे प्रायश्चित्त घेऊन माफी मागण्याचे मंगलकार्य ही मंडळी कधी करणार आहेत? मराठा समाजातील लेकी-सुना न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत, पण लश्कर-ए-तोयबाची अतिरेकी इशरत जहांला ‘देशाची मुलगी’ ठरवून निरपराध संतीण ठरवण्याचा जो प्रकार राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने केला तो आज रस्त्यावर उतरलेल्या सर्व मराठा माय-भगिनींचा अपमान ठरावा. आज मराठा समाजाच्या मुली म्हणजे रणरागिणी आहेत. इशरत जहांला देशाची लेक बनवण्याचा जो घाणेरडा प्रकार झाला त्याबद्दल धनंजय मुंडे माफी मागणार आहेत का? असा उलट सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
उजनी धरणाचे हक्काचे पाणी मागणार्या दुष्काळग्रस्त शेतकर्यांना उद्देशून ‘पाणीच नाही तर सोडणार कोठून? मग मुतता काय तिथं?’ असे उर्मट विधान करणार्या अजित पवारांनी समाजाची माफी मागितल्याची नोंद नाही. हे धरणातले पाणी शिवांबूने गढूळ करून शेवटी समस्त जाती-धर्मांच्या मुखातच जाणार होते ना? पण यावर थातूरमातूर उत्तरे देऊन अजित पवारांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला पुन्हा अजित पवारांच्या या मुक्ताफळांबाबत शरद पवारांनी त्यावेळी कानावर हात ठेवले होते असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
ओसाड गावच्या विखे-पाटलांविषयी काय बोलावे? आज त्यांना मराठा म्हणून जाग आली आहे, पण आज जागे झालेले विखे-पाटील अनेक वर्षे काँग्रेस पक्षात अडगळीत पडून अपमानाचेच जिणे जगत होते. त्यांना तेथे पायपुसण्याचीही किंमत नव्हती. शिवसेनेत येताच या पायपुसण्याचे भाग्य फळफळले व विखे पिता-पुत्रांना प्रथमच लाल दिव्याचा मान मिळाला होता. शिवसेनेमुळे त्यांना हा लाभ झाला. अन्यथा पावसाळ्यातील गांडुळांप्रमाणे यांचे राजकीय जीवन अल्पजिवीच ठरले असते, पण गांडुळांना कधी शेषनाग होता येत नाही व फूत्कारही सोडता येत नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.