निवडणूक आयोगाचा निकाल राष्ट्रवादीपुरता मर्यादित; प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 01:51 PM2024-02-07T13:51:42+5:302024-02-07T13:52:23+5:30
लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान मुद्द्यांचे राजकारण झाले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
नागपूर - Prakash Ambedkar on NCP ( Marathi News ) केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दिलेला निकाल हा त्या पक्षापुरता मर्यादित आहे. त्याचा आघाडीवर किंवा बाहेर काही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह गेलंय, परंतु शरद पवार आहे तिथेच आहे. वरचढ कोण असेल यात मी जात नाही. पण आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू होत नाही तोपर्यंत वर्चस्व कोणाचे होईल सांगता येत नाही. निवडणूक आयोगाचा निकाल राष्ट्रवादी पुरता मर्यादित आहे. त्याच्याबाहेर परिणाम होणार नाही असं त्यांनी सांगितले.
तर लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान मुद्द्यांचे राजकारण झाले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची जी बैठक झाली. त्यात भाजपा सरकार घालवणार असा आपला हेतू असला. त्यात उद्या यशस्वी झालो तर पुढचा कार्यक्रम काय याबाबत चर्चा आणि महत्त्वाचा मसुदा बैठकीत सादर केला. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर पुढच्या बैठका सुरू होतील. जागावाटपाची चर्चा अजून सुरू झाली नाही. आम्ही कुठलीही मागणी केली नाही असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.
दरम्यान, राजकीय परिस्थितीत जर तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची ऑफर आली तर तुम्ही स्वीकारणार का असा प्रश्न पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना केला. त्यावर मला बऱ्याचदा पदांची ऑफर आली आणि मी ती नाकारली. मला रस्त्यावरचं जगणं आवडतं. कैदीत जगणं आवडत नाही. मी अगोदरपासून ऑफर नाकारत आलोय असं त्यांनी स्पष्ट केले. तर मागील ५ वर्ष ईव्हीएमबाबत मी कोर्टात लढतोय. आता हळूहळू इतर येतायेत. कोर्ट आणि निवडणूक आयोग दोन्हीकडे दबाव टाकायला हवा. ईव्हीएममधून निघणाऱ्या VVPAT ची मोजणी व्हायला हवी अशी मागणी आंबेडकरांनी केली.