अजित पवारांची हीच का संस्कृती?
By admin | Published: February 9, 2017 12:54 AM2017-02-09T00:54:02+5:302017-02-09T00:54:02+5:30
‘राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे वलय पाहून गोपीनाथ मुंडे यांनी आपला वाढदिवसही १२ डिसेंबर रोजी जाहीर केला होता...’ अजित पवारांच्या या वक्तव्याचा बुधवारी पालकमंत्री पंकजा मुंडे
बीड : ‘राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे वलय पाहून गोपीनाथ मुंडे यांनी आपला वाढदिवसही १२ डिसेंबर रोजी जाहीर केला होता...’ अजित पवारांच्या या वक्तव्याचा बुधवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी खरपूस समाचार घेतला. पवारांची हीच का संस्कृती? असा सवाल उपस्थित करून त्यांनी अजित पवारांनी केलेला दावा खोडून काढला.
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘पवारांच्या या वक्तव्याने संपूर्ण मुंडे कुटुंबीयाला वेदना झाल्या आहेत. माझ्या लहाणपणापासून मी बाबांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजीच पाहात आले आहे. मी शरद पवार यांचा कायम आदर करते. एका कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, तेव्हा त्यांचा उल्लेख मी ‘राजकारणातील दिलीपकुमार’ असा केला होता,’ याची आठवणही त्यांनी करून दिली. अजित पवार यांना आजही गोपीनाथ मुंडे यांची धास्ती वाटत आहे. त्यामुळेच ते पातळी सोडून बोलत आहेत, असा चिमटाही पंकजा यांनी काढला. निवडणुकीत विरोधकांकडे कुठले मुद्देच उरले नाहीत. त्यातून पवारांनी हे विधान करून मुुंडे समर्थकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदार हुशार असून, विकासाची क्षमता असलेल्या भाजपालाच संधी देईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
(प्रतिनिधी)